सावंतवाडी : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा आहे. राजन तेली यांच्या प्रवेशाचा पक्षाला मोठा फायदा होईल. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, मित्रपक्षाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांनी दिला. आपली रेष मोठी करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांना केले. लोक आपल्याकडे आशेने बघत असल्याचेही ते म्हणाले. माजी आमदार राजन तेली यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत केल्यानंतर सावंतवाडीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेना नेते, आमदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. बांद्यानंतर सावंतवाडी येथील माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात त्यांचे स्वागत झाले. कट्टर विरोधक असणारे श्री. तेली जवळपास एका वर्षा नंतर पुन्हा दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी यानिमित्ताने आले. सावंतवाडी येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत तेली यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सावंतवाडीचे उदाहरण देत दीपक केसरकर यांच्या कामाचे कौतुक केले. शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण, पक्षाने लोकांच्या मनात घर केले आहे. राजन तेली यांच्या रूपाने पक्षाची ताकद वाढली आहे. आपले नाते कधीही तुटले नव्हते, असे सांगत त्यांनी तेली यांच्या प्रशासकीय अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असे मत व्यक्त केले. तर स्थानिक निवडणूकांत युती करायची की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेते निर्णय घेतील, खासदार नारायण राणे ते ठरवतील असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत कोणीही हपापलेलं नाही, पक्षात अशी चांगली लोकं यावीत हा उद्देश आहे. यासाठी दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन नेहमी मिळत असल्याचे राणे म्हणाले.
दरम्यान, माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, मंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले. निवडणुका तोंडावर आहेत आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आपण दीपक केसरकर यांची भेट घेतली आहे. युती झाली तरी ठीक किंवा नाही झाली तरी ठीक, वरिष्ठ नेते निर्णय घेतील.आम्ही सगळे एकत्र आहोत आणि जिल्ह्यात भरघोस निधी आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. किंतू-परंतु मनात नको असे सांगत, जिथे असतो तिथे प्रामाणिक काम करतो, अशी भूमिका स्पष्ट केली. सिंधुदुर्ग शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. लवकरच काठावरचे लोकही पक्षात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पक्षाची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. आम्ही निवडणुकीसाठी तयारीत आणि सक्षम आहोत. आमच्या पाठीशी दीपक केसरकर, निलेश राणे, उदय सामंत आणि आता राजन तेली यांची साथ आहे. शिवसैनिक लढवय्या आहे आणि तो लढला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आम्हाला आहे, नेते सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत व्यक्त केले.


