सावंतवाडी : आज महाराष्ट्र आरोग्य विभागाचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. तातडीने या रुग्णालयासाठी फिजीशियन देण्याबाबत व इतर समस्यांवर चर्चा झाली. यावेळी अटल प्रतिष्ठान, सामाजिक बांधिलकी, अभिनव फाऊंडेशन या संस्थेकडून लेखी निवेदन देण्यात आले.

दरम्यान अॅड. नकुल पार्सेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील आरोग्य सेवेच्या समस्यांबाबत निवेदन सादर करून महाराष्ट्र आरोग्य विभागाचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांचे लक्ष वेधले.
आपल्या निवेदनात अॅड. नकुल पार्सेकर म्हणतात- एक सजग नागरिक व समाजिक कार्यकर्ता म्हणून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या बाबतीत काही महत्वाच्या समस्या आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकुण चार उपजिल्हा दर्जाची रुग्णालये असून त्यापैकी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रामुख्याने दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यातील एकशे सदुसष्ट महसुली गावातील रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. सुमारे तीस वर्षापूर्वी जेव्हा जिल्हा रुग्णालय कार्यरत होत. तेव्हा या दोन तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हयातील रुग्णांना चांगली सेवा मिळत होती मात्र उपजिल्हा रुग्णालये झाल्यापासून या रुग्णालयात ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब रुग्णांची हेळसांड होते. बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही.
रुग्णांना अगदी शेवटच्या क्षणी गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेजला रेफर केल्यावर त्या ठिकाणी उपचार होतात. मात्र सदर रुग्ण हे दुसऱ्या राज्यातील असल्याने त्यांना प्राधान्य दिले जात नाही.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वानवा असल्याने या ठिकाणी अद्ययावत अति दक्षता विभाग असूनही एखादा हार्ट अॅटॅक चा रुग्ण हा या रुग्णालयात फिजिशियन नसल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी असणारा रुग्णांचा ओघ पाहता कमीत कमी निदान पंधरा पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. ज्याठिकाणी आजच्या घडीला फक्त पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. हे अधिकारी त्यांच्यावर पडणाऱ्या अति ताणाच्या कामामुळे जास्त वेळ थांबून रुग्णांना दिलासा देत असेल तरीसुध्दा त्याला मर्यादा आहेत.
साधारणपणे सद्यस्थितीत दहा पेक्षा जास्त विविध विषयातील कंत्राटी डॉक्टर आहेत. मात्र जेव्हा इमरजन्सी असेल तेव्हा हे कंत्राटी डॉक्टर त्यासाठी वेळेत पोचू शकत नाहीत. कारण ते आपला व्यवसाय सांभाळून महिन्यातून ठराविक वेळेतच सेवा देत असतात.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत, ट्रोमा केअर सेंटरची आवश्यकता असून त्यासाठीही तज्ञ कर्मचारी वर्ग नियुक्त करणे गरजेचे आहे. ब्लड बँकेतही पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने अनेकदा रुग्णांना समस्येला तोंड द्यावे लागते. आपल्या या पाहणी दौऱ्यात या उपजिल्हा रुग्णालयासाठी जर आपण तातडीने फिजिशियन दिल्यास मोठ्या प्रमाणात गरजु रुग्णांना दिलासा मिळू शकतो. माझ्या माहितीनुसार संपूर्ण जिल्ह्यात फक्त एकमेव फिजिशियन आहे.
काही काळ आपण या जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांची आपल्याला जाण आहे. आपणांस विनंती आहे आपण गांभीर्याने या विषयांत लक्ष घालून गरजु रुग्णांना दिलासा द्यावा, अशी निवेदनाद्वारे श्री. पार्सेकर यांनी मागणी केली आहे.
Advt –


