सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यांबाबत अभिनव फाऊंडेशनने १० वर्षांपूर्वी याचिका दाखल केली असून कोल्हापूर खंडपीठात ती सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तथ्य शोधक समिती गठीत करून आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. तसेच आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह देखील भेट देऊन गेलेत. त्यामुळे निश्चितच बदल दिसतील ही अपेक्षा आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने याला वेगळं वळण दिलं जाऊ नये. तसेच तेथील डॉक्टर, संपूर्ण रुग्णालय कर्मचारी व रूग्णांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी केले आहे.
श्री. सुर्याजी म्हणाले, अभिनव फाउंडेशन ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. येथील सर्व सामान्य जनतेसाठी ते लढा देत आहेत. निश्चितच त्याचा फायदा रुग्णालयाला होताना दिसेल. त्याबाबतची जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. न्यायालयाने नेमलेली तथ्य शोधक समिती पाहणी करून गेली आहे. यात आरोग्य उप संचालक आहे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ॲड संग्राम देसाई तटस्थपणे आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारची गोष्ट लपवली जाणार नाही, असा विश्वासही दिला आहे. न्यायालयाला ते अहवाल सादर करणार असून योग्यच निर्णय न्यायदेवता देईल, हा विश्वास आहे. आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह देखील येऊन गेलेत. त्यांनीही रूग्णालयाची पहाणी केली आहे. त्यामुळे निश्चितच सकारात्मक बदल होताना दिसतील. मात्र, यात विनाकारण सेवा देणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. कारण, प्रसूतीसह,दिवसाला ४०० बाह्यरुग्ण तपासणी व इतर बरेच रुग्ण इथे उपचार घेत आहेत. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याचीही दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय १०० बेड चे असून बऱ्याच गैरसोय होत असलेल्या समस्या मार्गी लागत आहे. एमडी फिजीशीयन, न्युरोलॉजिस्ट व वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाचे सचिव यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्याबाबत हालचाली देखील सुरू झाल्यात. तसेच खंडपीठाकडून देखील ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस आदेश दिले जातील. त्यामुळे सद्यस्थितीत संयम बाळगण्याची आवश्यकता असुन उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी व सद्यस्थितीत रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे आहे असे आवाहन देव्या सूर्याजी यांनी केले.


