कणकवली : भावी पिढीच्या मेंदूची मशागत पुस्तकेच उत्तम करू शकतात, त्यातून भावी पिढीच्या आयुष्याची सक्षम उभारणी होऊ शकते. माणसाची मानसिक दशा जर उत्तम असेल तर तो क्रिएटिव्ह विचार करू शकतो. जर मानसिक दशा नीट नसेल तर तो विध्वंसक विचार करतो. त्याचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि एकंदर सामाजिक जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून भावी पिढीने पुस्तके वाचण्याचा ध्यास घ्यायला हवा असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी कणकवली महाविद्यालयात आयोजित भूतपूर्व राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी विचार मंचावर वाचनालय समिती प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शामराव दिसले, ग्रंथपाल विजय परब, प्रा. सचिन दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. महालिंगे पुढे म्हणाले की, वाचनातून मन आणि मेंदूचा सुयोग्य संगम व्हायला हवा, तरच माणसाचे व्यक्तिमत्व सजग होऊ शकते. निर्बुद्ध समाज दुसऱ्याच्या तंत्राने काम करते, विचार करणारी पिढी असेल तर दुसऱ्याच्या चुकीच्या गोष्टीना प्रतिसाद देत नाही. खरे वा खोटे तपासण्याची शक्ती थिंकिंग करणाऱ्या पिढीमध्ये असते. अशी पिढी घडवणे म्हणजेच ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल. युवा पिढीने या विचारांचे चिंतन करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे आव्हानही प्रा. महालिंगे यांनी केले.
यावेळी वाचनालय समिती प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी वाचन प्रेरणा दिनामागची भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तर डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी विद्यार्थी वर्गाने वाचनाची कास धरून आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.
डॉ. शामराव दिसले यांनी ” आपण विज्ञान विषयाचा विद्यार्थी असूनही विज्ञानाच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थीदशेत मराठी साहित्याचे वाचन करत होतो, त्याच्या माझ्या व्यक्तिगत जीवनावर खूप चांगला परिणाम झाला “असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रंथपाल विजय परब यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे यांनी केले. यावेळी पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मेंदूची योग्य मशागत करण्यासाठी पुस्तकेच प्रभावी ठरू शकतील! – प्रा. युवराज महालिंगे. ; कणकवली कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


