- फिजिशियनचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न.
- ॲड. अनिल निरवडेकरांच्या माध्यमातून आरोग्य समस्याला टॉनिक मिळणार!
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयनची कमतरता लक्षात घेता येत्या दोन दिवसांत याठिकाणी डॉ. शंतनू तेंडोलकर हे सामाजिक भान ठेवून आपल्या वेळेनुसार सेवा देणार आहेत. दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजीशीयन असणार आहे. डॉ. तेंडोलकर यांसह ३ खासगी परिचारिका आयसीयू युनीटमध्ये सेवा देणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस डॉ. शंतनू तेंडोलकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ॲड.अनिल निरवडेकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य रवी जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. ऐवळे म्हणाले, डायलेसीस युनीटसाठी डॉ. तेंडोलकर गेली १० वर्ष रूग्णालयात सेवा देत आहेत. आजची फिजीशीयन अभावी परिस्थिती बघता त्यांना आपण विनंती केली होती. यासंदर्भात अॅड. निरवडेकर यांच्या माध्यमातून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली होती. यातून मार्ग काढण्याची सुचना त्यांनी केली होती. यातूनच डॉ. तेंडोलकर यांचे नाव समोर आले. त्यांना आपण विनंती केली असता डायलेसीस सोबत ही सेवा देण्यास तयार झाले आहे. यासाठी अॅड. निरवडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. डॉ. तेंडोलकर यांच्यासह अन्य तीन परिचारिका याठिकाणी आयसीयू युनीटमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या मानधनाचा खर्च जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केला आहे. त्यांच्या नावे बँक खाते सुरू करून तेथून मानधन संबंधितांना दिले जाणार आहे, असे ते म्हणाले. तसेच अभिनव फाउंडेशनन जनहित याचिका दाखल केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. खंडपीठ शासनाला निर्णय देईलच. देव्या सुर्याजी व रवी जाधव यांनी येथील समस्यांना गती देण्याच काम केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयन नसल्याने रुग्णांची होणारी परवड पाहता सामाजिक उपक्रमातून आम्ही हा पुढाकार घेतला आहे. यामागे कोणतेही राजकारण वा स्वार्थ नाही. मी यासंदर्भात एक सावंतवाडीकर म्हणून श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सुचनेनुसार आपण हे काम करत आहोत. या कामामध्ये कोणीही राजकारण न पाहता सामाजिक बांधिलकी ठेऊन पुढे यावे, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, राजकीय नेत्यांनी आर्थिक स्वरूपात हातभार लावाव असे आवाहन केल.
डॉ. तेंडोलकर म्हणाले, केवळ सामाजिक भान व इथली परिस्थिती पाहता अधिक्षक डॉ. ऐवळे व अॅड. निरवडेकर यांच्या विनंतीवरून ही सेवा देणार आहे. परंतु, हे करत असताना माझ्या खासगी हॉस्पिटल वा येथील रूग्णांकडे दुर्लक्ष करणार नाही. माझ्या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यानंतर वेळेनुसार डायलेसीस रुग्णांना सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात येणार त्यावेळी इतर सर्व रुग्णांचीही तपासणी करणार आहे. कुठल्याही प्रकारे बांधील नसणार. मात्र, रेफर होणारे रुग्ण कमी व्हावेत यासाठी माझे प्रयत्न राहतील. दोन ऑन कॉल डॉक्टरांच्या व्यतिरिक्त मी तिसरा फिजीशीयन म्हणून येथे १०० टक्के सेवा देईन असे, त्यांनी स्पष्ट केले.


