सावंतवाडी : शेकरूच्या वाढत्या संख्येमुळे नारळ उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बदलत्या हवामानामुळे व विविध प्रकारच्या रोगराईमुळे आधीच नारळाचे उत्पन्न फार कमी झाले आहे त्यातच माकडांमुळे नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते त्यात भर म्हणून आता शेकरू कडूनही मोठ्या प्रमाणात नारळ बागांचे नुकसान होत असून याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शेकरू या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून विशेष संरक्षण आहे. त्यातच सिंधुदुर्गातील घनदाट जंगल त्याच्या प्रजननासाठी अतिशय पोषक असे आहे. त्यामुळे हा दुर्मिळ प्राणी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात आढळतो जंगलात राहणाऱ्या या प्राण्याला खाद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आता त्यांनी नारळ बागांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
माकडांची धरपकड मोहीम राबवून वनविभागाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र शेकरू या प्राण्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे याची मोठी अडचण आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. शेकरू हा प्राणी नारळ खाऊन ते तसेच नारळाच्या झाडावर वरतीच लटकलेले असतात त्यामुळे पंचनामा करताना तो कशा पद्धतीने करावा याच्या मार्गदर्शक सूचना वनविभागाकडे नाही. वन विभाग एका नारळासाठी फक्त सात रुपये एवढी तुटपुंजी नुकसान भरपाई देते. तसेच एका सातबारा नंबर वरील एकदा पंचनामा केल्यानंतर पुन्हा वर्षभरात त्या सातबारा मध्ये पंचनामा करता येत नाही अशा जाचक अटी आहेत. हा प्राणी वारंवार येऊन नारळाचे नुकसान करत असल्याने पुन्हा पुन्हा त्याचे पंचनामे कशा पद्धतीने करावेत याच्या मार्गदर्शक सूचना विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे नाहीत. या सर्व अडचणींचा विचार करून नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेकरू या प्राण्यांकडून केले गेलेल्या नुकसानीच्या पंचनामेसाठी शासनाने आपले नियम व अटी बदलणे गरजेचे आहे आणि याचा पाठपुरावा राजकीय नेतृत्वासोबत येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील करणे गरजेचे आहे.


