सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये ‘कमवा व शिका’ या तत्त्वाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान देण्यासाठी शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत आकाश कंदील, चांदण्या, रंगीत पणत्या, फराळ यांच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रदर्शन व विक्रीत इयत्ता तिसरी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर प्रदर्शन व विक्रीत विद्यार्थ्यांनी स्वतः कुशलतेने तयार केलेले आकर्षक व नाविन्यपूर्ण आकाश कंदील ,सुबक चांदण्या, सुंदर नक्षीकाम करून रंगविलेल्या पणत्या इत्यादी वस्तू मांडण्यात आल्या. तसेच प्रशालेच्या पालकांनी फराळाचे खमंग व चविष्ट पदार्थ प्रदर्शन व विक्रीस ठेवले होते. ग्राहकांचा या प्रदर्शन व विक्रीस उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक श्री डी. टी. देसाई, सहसंचालक ॲड.शामराव सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती.अमिना नाईक यांनी केले. प्रदर्शन व विक्री हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम.श्रृती जोशी व श्री प्रशांत गावकर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच इतर सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.


