सावंतवाडी : भजनी परंपरेचा गौरव जपण्यासाठी, कलाकारांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि या कलेला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही संस्था नुकतीच अधिकृतरीत्या नोंदणीकृत झाली असून, जिल्ह्यातील भजनी कलाकारांसाठी ही एक ऐतिहासिक आणि अभिमानाची घटना ठरली आहे.
संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे अत्यंत व्यापक असून — *भजनी कलाकारांना शासनस्तरावर अनुदान मिळवून देणे, “स्वातंत्र्य भजन सदन” उभारणी, शासकीय ओळखपत्रांची व्यवस्था, शाळांमध्ये संगीत शिक्षकांची नेमणूक, बाल भजन शिबिरे, जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, संगीत वाद्यांची तरतूद, तसेच भजन स्पर्धांसाठी एकसंध नियमावली तयार करणे* — अशा अनेक ठोस उपक्रमांद्वारे भजनी कलेचे संवर्धन करण्याचा निश्चय संस्थेने केला आहे.
या संस्थेचे *अध्यक्ष बुवा श्री. संतोष कानडे, सचिव बुवा श्री. गोपीनाथ लाड, आणि खजिनदार श्री. सतीश रावराणे यांच्या नेतृत्वाखाली संस्था कार्यरत असून, त्यांची दूरदृष्टी आणि कलाकारांविषयीची निष्ठा सर्वत्र कौतुकास्पद ठरते आहे. संस्थेचा पहिला कार्यक्रम मळगाव येथील पेडणेकर हॉल येथे संपन्न झाला. या छोटेखानी पण उत्साही कार्यक्रमात संस्थेची अधिकृत ओळख, उद्दिष्टे आणि पुढील दिशा सर्वांसमोर ठेवण्यात आली. भजनी कलाकारांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या निवारणासाठी उपस्थित कलाकारांशी खुली चर्चा घेण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद कामत, प्रेमानंद देसाई, संदीप नाईकधुरे, ज्ञानेश्वर मेस्त्री, हेमंत तवटे, कृष्णा राऊळ, दीपक पाळेकर, राजा सामंत, बाळू कांडरकर, सुरेश गावडे, नितीन नाईक, रुपेंद्र परब तसेच मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी संस्थेच्या पुढाकाराचे मनापासून अभिनंदन केले आणि शासनस्तरावर आवश्यक तो पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले.
भजनी कला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आणि ही संस्था त्या आत्म्याला नवा श्वास देण्याचे काम करत आहे. “भजन हे केवळ गाणे नाही, ती एक साधना आहे”, या भावनेतून काम करणारी ही संस्था जिल्ह्यातील कलाकारांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
भविष्यात “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही लोककलेला हक्काचा दर्जा मिळवून देईल आणि भजनी कलाकारांच्या श्रमांना समाजात नवी ओळख देईल, अशी सर्व संगीत प्रेमींची अपेक्षा आहे.


