Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी भटवाडीतील खड्ड्यांनी दिवाळीतही छळले! ; नागरिकांनी व्यक्त केला रोष.

सावंतवाडी : गणेश चतुर्थीपूर्वी सावंतवाडी शहरात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी भटवाडी परिसरात जे खड्डे खोदले होते, ते दिवाळी आली तरी अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. नवरात्रोत्सव, दसरा आणि आता दिवाळीसारखे मोठे सण या खड्ड्यांतूनच जात असल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अपघातांची मालिका, नागरिक जखमी भटवाडीतील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ते बोरजिस वाड्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी हे मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोलगाव आणि निरूखेवाडीपर्यंत जाणारा हा रस्ता वर्दळीचा असून, या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांसह वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये नागरिक जखमी झाले आहेत.

पाणीपुरवठा विभागाची ‘मलमपट्टी’ धोक्याची पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकल्यानंतर हे खड्डे बुजवण्यासाठी केवळ खडी टाकून ‘मलमपट्टी’ केली आहे. ही खडी रस्त्यावर पसरल्यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागते, तर चारचाकी वाहनांना बाजू देताना खडीमुळे अपघात होत आहेत. पाणीपुरवठा विभागाला या खड्ड्यांकडे लक्ष कधी देणार, असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान नव्याने टाकण्यात आलेली पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्यामुळे सर्वत्र रस्ता सर्वत्र जलमय झाला होता नुकतेच या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले यामुळे आणखी दुसरा एक खड्डा रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेला आहे हाही खड्डा धोकादायक बनला आहे.

प्रशासनाच्या आश्वासनाचे काय? प्रशासनाकडून पावसाचे कारण दिले जात होते, मात्र परतीचा पाऊस थांबून आठ दिवस उलटले तरी खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही काम सुरू झालेले नाही. पाणीपुरवठा विभागाने या खड्ड्यांवर खडी टाकून डांबरीकरण करून खड्डे बुजवणार असल्याचे आश्वासन दिले होते, पण ते केवळ आश्वासनच ठरले आहे.

गणेशाचे आगमन ते दिवाळी, सर्व काही खड्ड्यातून गणेशोत्सवाच्या आगमनापासून सुरू झालेली खड्ड्यांची समस्या नवरात्र, दसरा पार करून आता दिवाळीतही कायम आहे. यामुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा येत्या काळात नगर परिषदेच्या निवडणुका होत असून, या निवडणुकांमध्ये नागरिक प्रशासनाला त्यांच्या दुर्लक्षित कारभाराबद्दल धडा शिकवण्याचा इशारा देत आहेत. त्वरित हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सावंतवाडी भटवाडीतील खड्डे : नेते रोज येतात, पण जाब कोण विचारणार? – नागरिकांचा संताप.

सावंतवाडी शहरातील भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिरापासून ते बोरजिस वाड्यापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांनी नागरिक त्रस्त असताना, याच मार्गावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी रोज ये-जा करत असतानाही प्रशासनाला कोणीही जाब विचारत नाही, ही खरी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

या खड्डेमय रस्त्यावरून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सातत्याने ये-जा करतात. विशेष म्हणजे, शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी याच भागातून नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, यापैकी कोणीही या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. नेते रोज अपघातग्रस्त रस्त्यावरून जात असतानाही दुर्लक्ष करत असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख पदाधिकारी आता तरी याकडे लक्ष देतील का, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.

सामाजिक बांधिलकीचे संस्थापक अध्यक्ष रवी जाधव यांनी खड्डे दुरुस्तीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने त्यांना येत्या बुधवारपर्यंत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भटवाडी परिसरात अद्याप एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही किंवा प्रशासनाने तशी कोणतीही तयारी केलेली नाही. याचा अर्थ प्रशासन केवळ आश्वासनांचा खेळ करत आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे !

गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत या खड्ड्यांतून जनतेचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे आता केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रशासनाला खडसावून खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत, अशी मागणी भटवाडी परिसरातील नागरिक जोरकसपणे करत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles