मुंबई : दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतेषबाजी आली. दिवाळीत भुईचक्र, पाऊस, बॉम्ब, रॉकेट यांसारखे फटाके वाजवले जातात. मात्र याच फटाक्यांमुळे काही ठिकाणी आग लागल्याची भीषण दुर्घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या रात्री संपूर्ण महाराष्ट्रात आगीच्या अनेक मोठ्या घटना घडल्या. फटाक्यांच्या ठिणग्या आणि विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे नवी मुंबई, नागपूर, शिर्डी यांसह अनेक दुकानात भीषण आग लागली. सुदैवाने यातील कोणतीही ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना रात्रभर अथक प्रयत्न करून अनेक ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवावे लागले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात साई मंदिराच्या एक नंबर प्रवेशद्वारासमोरील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या साई सिल्क बिग बाजार या साडीच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे साडी मालकाचे आणि बाजूच्या इतर दुकानांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शिर्डी नगरपरिषद, साईबाबा संस्थान आणि परिसरातील अग्निशमन दलाच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
नागपुरात 10 ठिकाणी आग –
नागपूर शहरात दिवाळीच्या रात्री फटाक्यांमुळे सुमारे दहा ते बारा ठिकाणी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये आठरस्ता चौकातील रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये भीषण आग लागली. तसेच पोलीस मुख्यालय मागे, बेसा-मनिषनगर आणि लकडगंज परिसरातही आगीच्या घटनांची नोंद झाली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा या सर्व आगींवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
जालन्यातही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील मंठा शहरात गादी घर आणि फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री आग लागून अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. पुणे-सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील बेकरीला पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तसेच, रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या प्रेरणा मतिमंद शाळेलाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ती वेळीच नियंत्रणात आली.
मोठी जीवितहानी नाही –
नवी मुंबईतील तुर्भे परिसरात घरात साठवलेल्या फटाक्यांमुळे आग लागून दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भंगार गोदामाला फटाक्यांमुळे आग लागल्याची नोंद आहे. तर कल्याण पूर्व येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बॅनर उडून वीज वाहिनीवर पडल्याने बॅनरला आग लागली. या सर्व घटनांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असले तरी, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


