मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची 1997 मध्ये जेव्हा दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली, तेव्हा संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. बॉलिवूडचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन त्यावेळी चर्चेत येण्यास सुरुवात झाली होती. परंतु एखाद्या प्रसिद्ध निर्मात्याची अशा प्रकारे भररस्त्यात हत्या केली जाईल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यापैकी नदीम सैफीचं नाव हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी एक असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी नदीम देश सोडून गेले. आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. नदीम सैफीच गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड होता, असा दावा त्यांनी केला आहे.
शुभांकर मिश्राला दिलेल्या या मुलाखतीत जेव्हा उज्ज्वल निकम यांना गुलशन कुमार यांच्या हत्येमागचं कारण विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी त्याचा संबंध गायिका अनुराधा पौडवाल आणि अलका याग्निक यांच्यातील कथित शत्रुत्वाशी लावला. ते म्हणाले, “होय, तो (नदीम सैफी) हत्येच्या कटात सामील होता. म्हणूनच तो भारतात परत येत नाहीये. अन्यथा तो खटल्याला का सामोरं जात नाही?”
गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर नदीम अनेक वर्षे युकेमध्ये राहिले आणि आता त्यानंतर ते दुबईत वास्तव्यास आहेत. काही वर्षांपूर्वी नदीम यांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी निकम पुढे म्हणाले, “त्यांनी माझ्याकडे परत येण्याचा प्रस्ताव दिला होता. मी म्हटलं.. नक्की परत या आणि खटल्याचा सामना करा. परंतु त्यांना तसं करायचं नव्हतं. जेव्हा आम्ही त्यांना लंडनमधून सरेंडर करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला होता.”
या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांना गुलशन कुमार यांच्या हत्येमागचं कारण विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सांगितलं, “ही एक वेगळी कहाणी आहे. अनुराधा पौडवाल त्यांची (गुलशन कुमार) गायिका होती आणि अलका याग्निक नदीम-श्रवण यांची गायिका होती. बास. नदीम यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांना वाटत होतं. नदीम यांच्या आदेशावरूनच त्यांच्या हत्येचा कट रचलण्यात आला, असं पोलीस मानतात. हा कट दुबईत रचला गेला होता.”
1990 च्या अखेरीस नदीम सैफी ब्रिटनला गेल्यानंतरही अनेक निर्मात्यांसोबत काम करत होते. अनेकदा त्यांनी गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांना फेटाळलं होतं. “मी पापाजींसाठी (गुलशन कुमार) छोट्या भावासारखा होतो,” असं ते म्हणाले होते. त्यांनी भारतात येऊन आपल्यावरील सर्व आरोप खोटे ठरवण्याची इच्छाही व्यक्त केली होती.


