वैभववाडी : वैभववाडी बस स्थानक येथे दुसरा वाहतूक नियंत्रक ताबडतोब मिळावा, अशी ई-मेलद्वारे मागणी राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक संदीप घोडे यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, संघटक विष्णुप्रसाद दळवी व सचिव संदेश तुळसणकर यांनी केली आहे.
वैभववाडी तालुक्याची निर्मिती होऊन ४० वर्षे झाली तरीही वैभववाडी तालुक्याची संपूर्ण एसटी वाहतूक व्यवस्था कणकवली आगारावर अवलंबून आहे. अनेक वर्षे वैभववाडी येथे एसटी थांबा हा कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या एका निवारावजा शेडमध्ये होता. पाच-सहा वर्षांपूर्वी महसूल विभागाची इमारत व जागा राज्य परिवहन महामंडळाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला एसटी थांब्याचे स्वरुप प्राप्त झाले. सुरुवातीपासून येथे एकच वाहतूक नियंत्रक असल्यामुळे सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत प्रवासी ग्राहकांना सेवा मिळत होती. त्यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या एसटी प्रवासी ग्राहकांची गैरसोय होत होती.
याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने आपल्या विभागाशी संपर्क साधून, पत्रव्यवहार करुन तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. ब-याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वैभववाडी येथे दि.५ सप्टेंबर, २०२४ पासून दुसरा वाहतूक नियंत्रक देण्यात आला होता. परंतु अचानकपणे गेल्या दोन महिन्यांपासून दुसरा वाहतूक नियंत्रक बंद केल्याने एसटी प्रवासी ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत एसटी प्रवासी ग्राहकांच्या तोंडी आणि लेखी तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडे आल्या आहेत. वैभववाडी येथे ताबडतोब दुसरा वाहतूक नियंत्रक मिळावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने रा.प.सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक संदीप घोडे यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
सदर मेलची प्रत –
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग,
तहसिलदार वैभववाडी,
अध्यक्ष/सचिव- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व
अध्यक्ष- वैभववाडी तालुका पत्रकार संघ यांना पाठवली आहे.


