मुंबई :एकीकडे काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत आघाडी करून निवडणूक लढण्यास नकार दिला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाच स्पष्ट केला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत महायुती तर राज्यात स्वतंत्रपणे लढून नंतर महायुती म्हणून एकत्र येणार अशी भूमिका जाहीर केली आहे. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे याबाबतचे वृत्त टीव्ही मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे.
सध्या महानगर पालिकांसह नगर पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अस्तित्वाच्या लढाईत उबाठा आणि मनसे एकत्र येऊन ठाकरे बंधूंचा एकत्रित लढण्याच्या शक्यता अधिक ठळक होत असताना काँग्रेसने ही ठाकरे युती साफ नाकारली असून स्वबळाची घोषणा केली आहे. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महायुतीचा फॉर्म्युलाच स्पष्ट केला आहे. मुंबई महानगर पालिकेत महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यातील स्थानिक पातळीवरील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर तिथे महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वबळावर लढून निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यात त्यांनी ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड ला स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे वक्तव्य मीडियामध्ये झळकल्यानंतर राज्यातील राजकारणात विविध शक्यतांची चर्चा सुरू झाली आहे.


