सावंतवाडी : आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीचे माजी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीला ‘राम राम’ ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी संजू परब यांनी मित्र पक्षासह विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, “आमचे काही मित्र सांगताहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढू!, अहो कसली मैत्री?, हे गोलमाल करणे त्यांनाच जमते. मी जे करतो ते डायरेक्ट करतो आणि सरळ करतो. कोणालाही अंगावर घेण्याची माझी ताकद आहे. माझा स्वभाव सरळ आणि स्पष्ट आहे. उगीचच काहीतरी सांगायचे आणि पाठीमागे वेगळे राजकारण करायचे, हे काम आजपर्यंत कधी केले नाही आणि ते मला जमणारही नाही. ज्यांनी सांगितले होते प्रवेश करून दाखवा त्यांना आज समजलं असेल ते कुठे आणि आम्ही कुठे?, त्यामुळे त्यांनी आपला कारभार योग्यरीत्या करावा, असा देखील सल्ला संजू परब यांनी मित्र पक्षाला आज दिला आहे.


