सावंतवाडी : सततचे होणारे हवामान बदल, अतिवृष्टी आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीकडे येथील लोकप्रतिनिधींकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणून जमिनी विकण्यास भाग पाडणे, हे यामागचे षडयंत्र तर नाही ना?, असा संशय आता यानिमित्ताने पुढे येऊ लागला असल्याचे ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे सांगितले. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांबद्दल तळमळ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक धुरी, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णतः कोलमडलेला दिसत आहे कारण दिवसेंदिवस वातावरणातील बदल वन्य प्राण्यांचा त्रास आणि त्यात करून अतिवृष्टी असे अनेक संकटे शेतकऱ्यांवर कोसळत आहेत कर्ज काढून शेती करणारा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत आहे. इ पीक पाहणी म्हणा किंवा फळपीक विमा म्हणा याबाबत सर्वत्र बोंबाबोंब आहे शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत तर नुकसानीची पाहणी अधिकारी वर्ग करतात पंचनामे ही करतात परंतु त्याची भरपाई मात्र कधीच वेळेवर मिळत नाही. आज विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ज्याप्रमाणे बळीराजांच्या न्याय हक्काप्रमाणे लढत आहे त्याप्रमाणे इथले लोकप्रतिनिधी लढताना भांडताना कधीच दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची साधी दखलही इथले नेते पुढारी मंत्री घेताना दिसत नाही,सरकार दरबारी आवाज उठवताना दिसत नाही हे इथल्या शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
आज कास मडूरा या भागात हत्ती प्रश्न सातत्याने गाजत आहे तेथील शेती बघायची मोठ्या प्रमाणात नुकसानी होत आहेत परंतु त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी जाताना कुठे दिसत नाही लोकप्रतिनिधी फक्त पत्रकार परिषद घेऊन वनताराचे गाऱ्हाणे गात आहेत. गेल्या काही दिवसापासून या प्रश्नाने ग्रासलेले शेतकरी आंदोलने उपोषण करण्यापर्यंत पोहोचले आहेत. परंतु त्यांच्याबद्दल इथल्या नेत्यांमध्ये तळमळच दिसून येत नाही याआधी सुद्धा जिल्ह्यात हत्ती प्रश्न निर्माण झाला होता 2014 मध्ये ज्यावेळी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत निवडून आले त्यावेळी हत्ती पकड मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांची वेदना पाहून प्रयत्न झालेत पण आजची तळमळ कोणत्याच लोकप्रतिनिधीकडून दिसत नाही.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून त्यांना आपल्या जमिनी विकण्यास भाग पाडणे हेच षडयंत्र या निमित्ताने जाणवत आहे शेतकरी कर्ज फेडण्यासाठी आपल्या जमिनी विकतो आणि त्या जमिनीवर डोळा ठेवणारे दिल्ली गुजरात येथील दलाल या ठिकाणी हजर असतात. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनतेची नाळ असलेल्या लोकप्रतिनिधीला येथील शेतकरी बागायतदारांनी निवडून देणे गरजेचे आहे. आणि मला खात्री आहे की शेतकरी यावेळी योग्य तो निर्णय घेताना दिसून येईल.


