वैभववाडी : वैभववाडीच्या साहित्य सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडावं म्हणून अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तथापि प्रभा प्रकाशन कणकवली आणि अक्षरवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी वैभववाडी एस. टी. स्टॅन्डनजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सभागृहात पहिले अक्षरवैभव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा यावर्षीच्या ख्रिश्चन मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सायमन मार्टिन, वसई यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रभा प्रकाशनचे संचालक कवी अजय कांडर आणि अक्षरवैभवचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, सचिव चेतन बोडेकर यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अक्षरवैभव साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवी अजय कांडर, प्रा. एस. एन. पाटील, चेतन बोडेकर यांच्यासह अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे पदाधिकारी, संदेश तात्या तुळसणकर, सफरअली इसफ, शैलेंद्रकुमार परब, मारुती कांबळे आदी उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष सायमन मार्टिन हे वसई येथील असून मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. सायमन मार्टिन हे गेली ४० वर्ष निष्ठेने कविता लेखन करत असून मराठीतल्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थातर्फे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. लेखनाची आणि जगण्याची पक्की भूमिका तसेच समाजासाठीची कृतीशीलता या विचाराने ते काव्य लेखन करत आले आहेत. यामुळे त्यांची प्रचलित कविता आपल्याला वाचायला मिळत नाही. तर प्रखर वास्तव त्यांच्या कवितेतून आपल्याला वाचायला मिळते. जगण्याची व्यामिश्रता आणि माणसाला माणसापासून तोडत जाणे या वेदनेचा प्रवाह त्यांच्या कवितेत आढळत असल्यामुळे त्यांची कविता वाचताना वाचक अंतर्मुख होत जात असतो. मराठी साहित्यातील अनेक महत्त्वाच्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या कवीच्या अध्यक्षतेखाली वैभववाडी सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या अविकसित राहिलेल्या भागातील साहित्य संमेलन आयोजित केले गेले आहे ही वैभववाडीच्या दृष्टीने महत्त्वाचीच घटना आहे.
. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर वैभववाडी तालुक्याची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. राजकीय दृष्ट्या पन्हाळा- गगनबावडाच्या छत्राखाली या तालुक्याचा विकास होत आला. त्यानंतर हा तालुका कणकवली देवगड मतदार संघाला जोडण्यात आला. यानंतर मात्र राजकीय दृष्ट्या वैभववाडी तालुका सतत चर्चेत राहिला. मात्र जिल्ह्यातील इतर तालुके ज्या वेगाने सांस्कृतिक दृष्ट्या प्रगती पथावर जाताना दिसतात तसा सांस्कृतिक विकास मात्र वैभववाडीचा होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर आता तालुक्यातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची स्थापना केली. वैभववाडीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील लेखक, कवीना हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाकडे जाण्यासाठी इथल्या लेखक, कवींना लेखनाच्या कुठल्या दिशेने जावं लागेल या संदर्भातही मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या सहयोगातून वैभववाडी येथे सदर पहिले अक्षरवैभव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाची रूपरेषा पुढील काही दिवसातच जाहीर करण्यात येईल अशी माहितीही या पत्रकार परिषद देण्यात आली.
अक्षरवैभव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सायमन मार्टिन! ; प्रभा प्रकाशन व अक्षरवैभव संस्थेतर्फे १६ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथे संमेलनाचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


