✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा नजीक येत आहेत, तसतसा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘महायुतीतचं’ पक्षप्रवेशांची जोरदार चढाओढ होताना दिसत आहे.
या आठवड्यात भाजपाकडून सावंतवाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अनेक ठिकाणी धक्के देण्यात आले. यात विशेष बाब म्हणजे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी या त्रिमूर्तींनी कलंबिस्त येथे एकत्र येत आगामी निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत सर्व जागा जिंकू आणि काही ठिकाणी आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील, असे विधान केले. मात्र या विधानाला रोखठोक, बिनधास्त, बेधडक या शब्दांच दुसरं नाव असलेल्या सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
केवळ ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर मित्र पक्षांच्या वतीने देण्यात आलेले ‘हिम्मत असेल तर त्यांनी भाजपचे पदाधिकारी फोडून दाखवावे!’ हे आव्हान संजू परब यांनी आपल्या चाणक्य नीतीने शह देत यशस्वीदेखील करून दाखवलं. मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे आव्हान स्वीकारत संजू परब यांनी त्यांना शह देण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न यानिमित्ताने केलेला दिसतो. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे साडेचार वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असलेल्या व सावंतवाडी शहराचे शहर मंडल अध्यक्ष असलेल्या आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य असलेल्या अजय गोंदावळे यांच्यासह तब्बल 40 कार्यकर्ते ज्यात भाजपाचे बुथ अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष तसेच युवा मोर्चाचे अनेक शिलेदार यांना भाजपातून शिंदे शिवसेनेत खेचून आणण्यात संजू परब यांना यश आले.
विशेष म्हणजे अजय गोंदावळे आणि सहकाऱ्यांचा प्रवेश संजू परब यांनी महेश सारंग यांच्या वाढदिनी केला आणि याचवेळी त्यांनी आपल्या प्रिय मित्राला वाढदिवसाचे हे त्यांच्यासाठी गिफ्ट असल्याचा जोरदार टोमणाही लगावला.

ह्याच गोष्टीला अनुसरून भारतीय जनता पार्टीने देखील शिंदे शिवसेनेला दुसऱ्या दिवशी सायंकाळी अर्थात शनिवारी सायंकाळी परशुराम चलवाडी आणि त्यांच्यासोबत काही लाखे वस्तीतील कार्यकर्ते विशाल परब यांच्या नेतृत्वात आपल्या पक्षात घेतल्याचे जाहीर केले.

मात्र हा पक्ष प्रवेश किती खोटा आणि दिशाभूल करणारा आहे?, हे एका तासात संजू परब यांच्या चाणक्य नीतीने सिद्ध केले. केवळ सिद्ध केले नाही तर मीडियासमोर तेथील तब्बल ७० वर्ष पेक्षा अधिक वृद्ध असलेल्या महिला भगिनींना मीडियासमोर प्रतिक्रिया देऊन त्यांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया जगासमोर आणल्या. याचवेळी संजू परब यांनी विशाल परब यांना अत्यंत शेलक्या भाषेत चॅलेंज दिले. ‘विशाल परब यांनी आपल्या औकातीत राहावं अन्यथा त्यांचे सगळे धंदे जनतेसमोर आणून माणगावचं पार्सल माणगावात पाठवेल!”, असा इशाराच दिला.

संजू परबांचा हा बेधडक अंदाज आगामी काळातील येणl निवडणुकांमध्ये त्यांची रोखठोक भूमिका विशद करणारा आहे.
“मी कोणालाही घाबरत नाही. भल्या भल्यांना अंगावर घेण्याची माझी ताकद आहे. त्यामुळे समोरच्यांनी आपली नाटकं बंद करावीत आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांना फसवण्याचे धंदे बंद करावेत!”, अशी जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केले.
शनिवारी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वात झालेला पक्ष प्रवेश आज केवळ सावंतवाडी पुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात चेष्टेचा विषय झालेला आहे.
आता आगामी काळात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यातच खरी लढत रंगणार हे देखील या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

ह्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मडुरासारख्या ग्रामीण भागात जन्म घेतलेले संजू परब हे रोखठोक आहेतच. शिवाय जनमाणसांना आपल्याकडे खेचण्याची त्यांची अफलातून चाणक्य नीतती त्यांच्या नेतृत्व कौशल्याची ओळख करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टीने संजू परब यांना हलक्यात घेऊ नये, अन्यथा त्यांना अनेक जागांवर मोठी किंमत मोजणी मोजावी लागणार, अशी देखील चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे.
आपले प्रेरणास्त्रोत असलेले कुडाळ-मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणेंचा मैत्रीपूर्ण पाठिंबा आणि माजी शालेय शिक्षण मंत्री तथा चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे दीपक केसरकरांची राजकारणातील श्रद्धा आणि सबुरी नक्कीच संजू परब यांना आगामी काळात राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम करणार, यात कोणतीही शंका नाही. मात्र संजू परब यांनी सुद्धा आगामी काळात गाफिल राहता कामा नये. कारण ‘कोणत्याही परिस्थितीत तोडा, फोडा आणि राज्य करा!’ तसेच हल्लीच्या परिस्थितीत सातत्याने होणारे कूटनीतीचे राजकारण यामुळे अनेकदा साधे सरळ राजकारण करणाऱ्यांना भाजपाच्या चतुर खेळीने आस्मान दाखवले आहे. हा अलीकडच्या काळातील भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीचा राजकीय इतिहास राहिला आहे. त्यामुळे संजू परब यांनी सुद्धा ‘जरा दमाने’ घ्यायला हवं!. अन्यथा अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.!
अर्थातच संजू परब देखील आजच्या घडीला ‘पुरून उरणारं’, अन् ‘फोडून दाखवा’ म्हटल्यावर ‘फोडून दाखवणारं’ असं चॅलेंज स्वीकारणारं दमदार राजकीय व्यक्तिमत्व आहे, हे वेगळे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज वाटत नाही.
आता महायुतीतील राजकीय सत्तासंघर्ष पुढील काळात अजून तीव्र होणार यात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा मात्र बळी जाणार, हे नक्की.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा आपला नेता सायंकाळपर्यंत आपल्याच पक्षात राहील काय? याची पुरेपूर खात्री करून नेत्यामागे आपण किती प्रामाणिक राहावं?, हे ज्याचं त्याने ठरवावं.
तूर्तास एवढेच..!


