सोलापूर : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र हे यश त्यांना विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, दरम्यान अजूनही हे पक्षप्रवेश सुरूच आहेत.
मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर अनेक नेते आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसताना दिसत आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी सुद्ध व्यक्त केली होती, मात्र अजूनही हे पक्षप्रवेश काही थांबलेले नाहीत, आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपने मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा धक्का दिला आहे. बुधवारी मुंबई येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्षांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडीमध्ये देखील पहायला मिळत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे.


