विशाखापट्टणम : भारतावर नवं संकट आलं आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम या भागातील किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळाने धडक दिली आहे. 17 किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ मछलीपट्टनमपासून 20 किमी, काकीनाडापासून 110 किमी आणि विशाखापट्टणमपासून 220 किमी अंतरावर आहे. सध्या किनाऱ्यावर 90-100 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर अशी – मोंथा चक्रीवादळामुळे काकीनाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. आता काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. काकीनाडा आणि यानमच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत असल्याचे समोर आले आहे. विशाखापट्टणमच्या काही भागात पावसामुळे भूस्खलन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांची परिस्थितीवर बारीक नजर –
हवामान विभागाच्या अलर्टनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. ते आज रात्री सचिवालयात असणार आहेत. मध्यरात्री चक्रीवादळाचा जोर जास्त असेल त्यामुळे नायडू हे सचिवालयातून परिस्थितीचे निरीक्षण करणार आहेत. यावेळी ते प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार आहेत. त्यामुळे जलद मदतकार्य होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या वादळाबाबत संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
3700 गावांना पावसाचा इशारा –
मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील 3778 गावांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी 22 जिल्ह्यांमध्ये 3174 पुनर्वसन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या वादळाचा रेल्वेसेवेलाही फटका बसला आहे. विजयवाडा विभागातील 54 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी या संकटात सावध रहावे यासाठी एसएमएस अलर् देखील पाठवण्यात आले आहेत.
7 जिल्ह्यांमधील वाहतूक बंद
मोंथा चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सात जिल्ह्यांमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने काही भागात संचारबंदी लागू केली आहे. कृष्णा, एलुरु, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकीनाडा, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा आणि अल्लुरी सीताराम राजू या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


