कल्याण : कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. डोंबिवली शहर पूर्व विभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे. यानंतर माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या दोन प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही एकाच वेळी भगवा हाती घेतला. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या गडाला जबरदस्त खिंडार पडले आहे.
स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय –
हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता. शेलार दाम्पत्याचा हा निर्णय डोंबिवलीच्या स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
माजी नगरसेवक सदाशिव शेलार हे काँग्रेसमध्ये एक प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जात होते, तर त्यांच्या पत्नी दर्शना शेलार यांनीही आपल्या कार्यकाळात नगरसेविका म्हणून आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या या सामूहिक प्रवेशामुळे काँग्रेसची स्थानिक ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे. या प्रवेशावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले. जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या दिशेने हे सर्वजण आमच्यासोबत काम करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. शिंदे गटाच्या विकासकामांची आणि जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेची दखल घेऊन अनेक नेते राज्यभर पक्षात दाखल होत आहेत आणि शेलार यांचा प्रवेश हा त्याच वाढत्या जनाधाराचे प्रतीक असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या गोटात मोठी चिंता –
सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार हे काँग्रेसचे दोन मोठे आणि अनुभव असलेले चेहरे होते. त्यांच्या जाण्यामुळे डोंबिवलीतील काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना हा झालेला प्रवेश पक्षाच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम करणारा ठरला आहे. तसेच यामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलून शिंदे गटाला मोठा फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसच्या गोटात या मोठी चर्चा रंगली असून पक्ष पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.


