मुंबई : महिला वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.
फोएबे लिचफिल्डने ठोकले जबरदस्त शतक –
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाकडून 22 वर्षीय फोएबे लिचफिल्डने जबरदस्त शतक झळकावले, तर अनुभवी एलिस पेरीने तुफानी खेळी खेळली. पण कर्णधार एलिसा हीली 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर लिचफिल्ड आणि पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भक्कम भागीदारी रचली. अमनजोतम कौरने अखेर लिचफिल्डला माघारी पाठवले. लिचफिल्डने फक्त 93 चेंडूंमध्ये 119 धावा करत अप्रतिम शतक झळकावले. तिच्या या खेळीत 17 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर बेथ मूनी 22 चेंडूत 24 धावा करून बाद झाली, तर एनाबेल सदरलँड केवळ 3 धावांवर माघारी फिरली.
एलिस पेरीची दमदार 77 धावांची खेळी –
एलिस पेरीने 88 चेंडूंमध्ये 77 धावा केल्या आणि तीही बाद झाली. एश्ले गार्डनरने आक्रमक खेळ करत 45 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या, मात्र ती रनआउट झाली. अखेर ताहलिया मॅक्ग्रा (12) आणि किम गर्थ (17) यांनी थोडेसे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर राधा यादव, क्रांती गौड आणि अमनजोतम कौरला प्रत्येकी 1 यश मिळाले आणि ऑस्ट्रेलिया 49.5 षटकांत 338 धावांवर गारद झाला.


