सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवरती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस महेश सारंग यांनी आपल्या आणि बँकेच्या बदनामी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजकीय द्वेषातून व आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदनामीकारक कृत्य केल्याचा आणि त्यामागे राजकीय विरोधकांचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पीडीएफ फाईलद्वारे सोशल मिडीयावर वृत्त प्रसिध्द करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महेश सारंग यांनी केली आहे.
सारंग यांनी म्हटले आहे की, भालचंद्र विलास गवस या व्यक्तीने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ओरोस, सिंधुदूर्ग येथे वस्तूस्थितीला धरून नसलेली व परीस्थीतीचा विपर्यास करणारी अशी खोडसाळ माहीती नमुद करून माझी स्वतःची, माझ्या कुटुंबाची व पर्यायाने ज्या बँकेत मी संचालक म्हणून कार्यरत आहे त्या बँकेची नाहक बदनामी व्हावी या कुटील हेतूने काल्पनीक माहीती देवून तसेच बँक कर्ज प्रकरण विषय माझ्या नावे व माझ्या कुटूंबीयांच्या नावे आज मितीस कोणतेही प्रकरण बँकेत नसताना धादांत खोडसाळ स्वरूपाचा तक्रारी अर्ज दाखल केला.
वस्तूतः मी स्वतः अगर माझे कुटुंबीय आजमितीस सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक लि. सिंधुदुर्ग बँकेला कर्ज स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात एक पैसाही रक्कम आजमितीस देणे लागत नाही, अशी वस्तूस्थिती असताना केवळ राजकीय द्वेशापोटी व माझे राजकीय जीवन खच्चीकरण करण्यासाठी हा खटाटोप असल्याचे ध्वनीत होत आहे. भारतीय जनता पार्टी, सरचिटणीस या पदावर कार्यरत असून माझी व माझ्या पक्षाची पर्यायाने बदनामी व्हावी हा सुध्दा त्यामागे तक्रारदार व त्या मागील माझे राजकीय विरोधक व शत्रू यांनी आगामी जिल्हा परीषद निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय षडयंत्र रचल्याचे स्पष्ट होत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच वस्तूतः ज्या व्यक्तीने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ओरोस, सिंधुदूर्ग यांचेकडे तक्रार केलेली आहे तो साधा सदस्य अगर खातेदार सुध्दा सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक लि. सिंधुदुर्ग या बँकेचा नाही. यावरूनच त्यामागे राजकीय शक्ती व विघ्नसंतोषी लोकांचे पाठबळ असल्याचे दृढ होत आहे. हे कृत्य हे समाज विघातक, सामाजिक तेढ व माझी तसेच माझ्या कुटूंबाची बदनामी करणारी तर आहेच. परंतु, राज्यात अग्रेसर व नावलौकीक प्राप्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक लि. सिंधुदुर्ग बँकेची सुध्दा पर्यायाने बदनामी करणारी असल्याने पूर्ण पत्त्यानिशी तक्रारी अर्ज दाखल न करणाऱ्या भालचंद्र विलास गवस या व्यक्तीचा शोध घेवून त्यांना पाठीशी घालणाऱ्या विघ्नसंतोषी शक्तीचा तपास व्हावा तसेच राष्ट्रीय माहीती विज्ञान केंद्र (NIC) कडून अर्जासोबत जोडलेल्या सातबारावरील Varitication ID 3307100001498533 नुसार माहीती घेऊन संबंधीत बदनामीकारक वृत्त पीडीएफ फाईल व्दारे सोशल मिडीयावर प्रसिध्द करणाऱ्या त्या व्यक्तीच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


