मुंबई : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग आजही सुरूच आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केल्याचं पहाला मिळालं.
दरम्यान आता पुन्हा एकदा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. जळगाव महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांच्यासह 13 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावातील भाजप जिल्हा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रवेशासाठी मुहूर्त मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला असल्याचा सांगितलं जात होतं. परंतु आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेशाचा मुहूर्त आज अखेर गवसला असून, आज दुपारी चार वाजता भाजप कार्यालयात हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
तर दुसरीकडे भाजपने काही ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना देखील धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती.


