पुणे : पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराला सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ दिसला ज्याने त्याच्या आयुष्यात उलथापालथ करून टाकली. व्हिडीओमध्ये एक महिला होती, जी खूप गंभीर आवाजात म्हणत होती- ‘मला असा माणूस हवा जो मला आई बनवू शकेल. मी त्याला २५ लाख रुपये देईन. मला त्याची जात, रंग किंवा शिक्षण याच्याशी काही देणे-घेणे नाही.‘
नेमकं काय झालं?
कंत्राटदाराने पाहिलेला हा व्हिडिओ ‘Pregnant Job’ नावाच्या पेजवर टाकला होता. कंत्राटदाराला ही गोष्ट आधी तर विचित्र वाटली, पण २५ लाखांच्या आमिषाने त्याने व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला. पुढे जे झालं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
“कंपनी”च्या नावावर फसवणूकीला सुरुवात –
फोन उचलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘प्रेग्नेंट जॉब‘ कंपनीचा असिस्टंट सांगितले. त्याने कंत्राटदाराला सांगितले की या कामासाठी त्याला आधी कंपनीमध्ये नोंदणी करावी लागेल, तेव्हाच त्याला आयडी कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळतील. त्यानंतर पैशांचा खेळ सुरू झाला. आधी नोंदणी फी, नंतर आयडी कार्डचा चार्ज, नंतर व्हेरिफिकेशन, जीएसटी, टीडीएस, प्रोसेसिंग फी… प्रत्येक वेळी काही ना काही नवे बहाणे काढले गेले.
१०० पेक्षा जास्त व्यवहारांत गेले ११ लाख रुपये –
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टूबरपर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त वेळा ऑनलाइन ट्रान्सफर केले, कधी UPI ने, कधी IMPS ने एकूण रक्कम होती सुमारे ११ लाख रुपये. सुरुवातीला त्याला विश्वास दिला की “सर्व काही प्रक्रियेत आहे” आणि लवकरच त्याची महिलेशी भेट घालून दिली जाईल. पण जसे कंत्राटदाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली, तसे समोरच्या नंबरने त्याला ब्लॉक केले.


