Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तात्काळ हकालपट्टी!

नाशिक : नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सिन्नरचे उदय सांगळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशिकचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर आणि दिंडोरी येथे उद्या दोघांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी दोघेही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कमळ चिन्ह हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी स्वीकारत, युतीचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

सिन्नर आणि दिंडोरीत बदलणार राजकीय समीकरण?

सिन्नर मतदारसंघात मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कट्टर राजकीय विरोधक उदय सांगळे आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर सिन्नरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर, दिंडोरीत झिरवाळ यांच्या विरोधात लढलेले चारोस्कर दाम्पत्य आता भाजपच्या गोटात दाखल होत असल्याने स्थानिक स्तरावरील सत्ता समीकरणे बदलणार आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ कारवाई, पक्षातून हकालपट्टी –

दरम्यान, या प्रवेशाच्या चर्चांना जोर मिळत असतानाच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने अधिकृत पत्रक काढून उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, “दोघांनीही पक्षविरोधी भूमिका घेत स्वार्थी आणि दलबदलू मानसिकता दाखवली आहे. त्यामुळे पक्षाची शिस्त राखण्यासाठी त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे.” त्यामुळे उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांच्या भाजप प्रवेशाची माहिती मिळताच राष्ट्रवादीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सिन्नर दिंडोरीत भाजपला फायदा होणार? 

मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या विरोधकांना आपल्या गोटात घेऊन भाजपने राजकीय शह दिल्याचं मानलं जात आहे. एकूणच, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणात नवा रंग चढला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, पुढील काही दिवसांत या हालचालींना आणखी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सिन्नर आणि दिंडोरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles