रायगड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याआधीच अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील चढाओढ कायम सुरू असून सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिला आहे. तटकरे यांनी गोगावले यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षात सामील केले आहे. त्यामुळे गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात हा मोठा धक्का मानला जातोय.

सुशांत जाबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश –

मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचे निकटवर्तीय आणि युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला महाडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाबरे यांना जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सुनील तटकरे यांनी दिली माहिती –
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पक्षप्रवेशाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तटकरे यांनी म्हटले की,’आज महाड येथे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी श्री. सुशांत जाबरे, हनीफभाई वसघरे, अनिश पठाण, श्री. सत्यवान यादव, श्री. समीर रेवाळे, श्री. संतोष धारशे, श्री. विठ्ठल घरटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला. या दरम्यान नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तिपत्र देण्यात आली असून, पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा, सर्वसमावेशक विकासाची भूमिका आणि आगामी काळातील ध्येयधोरणे स्पष्ट करत, पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. यासोबतच, ‘जेव्हा एखादा तरुण कार्यकर्ता प्रेरणा घेऊन समाजकारणात उतरतो, तेव्हा त्याला आत्मविश्वास आणि धैर्याची गरज असते. तुमच्या या प्रवासात मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. उद्याच्या भविष्यासाठी आता नव्या विचाराने काम करण्याची हीच वेळ आहे. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत,’ असा विश्वास व्यक्त केला.


