मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.

शेफाली आणि स्मृती मानधानाची विक्रमी भागीदारी –
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करेल असं वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मंधानाला 45 (58) धावांवर माघारी पाठवलं.
चांगली सुरुवात पण मधल्या फळीत अपयश…
मानधना आणि शेफाली यांच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही फलंदाज जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. त्याचा परिणाम थेट धावफलकावर दिसून आला. स्मृती मानधानाच्या बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 24 (37) धावांवर बाद झाली, तर शेफाली वर्मा 87 (78) धावांवर माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्या फक्त 20 (29) धावा करून बाद झाल्या. अमनजोत कौरने 12 (14) धावा केल्या. रिचा घोषने काही क्षण झळक दाखवत 34 (24) धावांची खेळी केली. शेवटी दीप्ती शर्मा 58 (58) धावा करून अखेरच्या चेंडूवर दुसऱ्या धावेसाठी धावताना धावबाद झाली. अशा प्रकारे भारताने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावा केल्या.


