मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं. महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.

रोहित शर्मा भावूक, टाळ्या वाजवत कौतुक –
महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा डी.वाय.पाटील स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी रितिका सजदेह देखील उपस्थित होती. ज्यावेळी भारताच्या दिप्ती शर्माने दक्षिण अफ्रिकेची दहावी विकेट घेत विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर रोहित शर्मा स्टँडवर पुढे येत टाळ्या वाजवून खेळाडूंचं कौतुक केलं. यावेळी रोहित शर्मा थोडा भावूक झाल्याचंही दिसून आले. टाळ्या वाजवत रोहित शर्मा आकाशाकडे बघत राहिला आणि काहीतरी चुकचुकला. (व्हिडीओवरुन देवाचे आभार मानल्याचे दिसत आहे) यादरम्यानचा रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा हा व्हिडीओ पाहून भारतीय नागरिक देखील भावूक होत आहे. दरम्यान, भारतात झालेल्या 2023 च्या वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. यावेळी रोहित शर्मासह सर्व खेळाडू आणि भारतीय भावूक झाले होते.


