मुंबई : काल रविवारी 2 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत विजय मिळवला आहे. त्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर तर भारतीय महिला संघातील खेळाडूंवर तर प्रेमाचा वर्षाव झाला आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी अमोल मुजुमदार यांचे देखील कौतुक केले आहे. सोशल मीडियावर महिला क्रिकेटसंघ जिंकल्यानंतर वेगवेगळ्याच्या प्रतिक्रिया दिसत आहेत. काहींनी संघाचे कोच अमोल मुजुमदार यांचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर एका यूजरने अमोल मुजूमदार यांचा फोटो शेअर करत खाली चक दे इंडिया या सिनेमातील शाहरुख खानचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, क्रिकेटमध्ये आयुष्य वेचणारे, कधीही भारतीय कॅप न घालणारे, तरीही महिला विश्वचषक जिंकणारे प्रशिक्षक म्हणून उदयास आलेले अमोल मुजुमदार रणजीचे दिग्गज… अमोल मुजूमदार!’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
अमोल मुजुमदार हे भारतीय क्रिकेटचे असे नाव आहे ज्याला या खेळाचा चाहता, प्रत्येक माणूस ओळखतो. रणजी क्रिकेटमध्ये धावांचा ढिग लावूनही ते कधीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नाहीत. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न त्यांना खेळाडू म्हणून पूर्ण करता आले नसले तरी कोच बनून त्यांनी जे केले त्याने इतिहासाच्या पानांत नाव कोरले आणि त्यांना अमर करून टाकले. अमोलने आपली जिद्द महिला संघाला विश्वविजेते बनवून पूर्ण केली. पहिल्यांदाच महिला विश्वविजेते झाल्या आणि असे वाटले की शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’मध्ये पडद्यावर साकारलेल्या भूमिकेला अमोलने जिवंत करून दाखवले.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये फ्लडलाइट्सखाली महिला संघाचा जल्लोष जगाने पाहिला. संपूर्ण स्टेडियम अविश्वास आणि आनंदाच्या वातावरणाने भरले होते. भारताच्या लेकरींनी इतिहास घडवत पहिल्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न पूर्ण केले. संघाच्या मुख्य कोच अमोलचे हे शाहरुख खानच्या पडद्यावर साकारलेल्या कबीर खानसारखे होते.
भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही –
प्रथम श्रेणीमध्ये ३० शतके आणि ११,१६७ धावा करूनही अमोल मुजुमदारांवर निवडकर्त्यांनी कधीही भारतासाठी खेळण्याची संधी दिली नाही. खेळाडू म्हणून जे काम ते करू शकले नाहीत ते कोच बनून पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. अमोलने नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि नंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला कोचिंग केले. त्यांना कमी बोलणारा पण जास्त पाहणारा असा कोच मानले जाऊ लागले. जेव्हा ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांना भारतीय महिला संघाचा मुख्य कोच नेमले गेले तेव्हा लोकांनी त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
रिअल लाइफचे कबीर खान –
शाहरुख खानने ‘चक दे इंडिया’ चित्रपटात अशा हॉकी खेळाडू कबीर खानची भूमिका साकारली होती जो आपल्या संघाला विश्वविजेते बनवू शकला नव्हता. तो या पराभवाच्या वेदनेसह जगत होता आणि महिला संघाचे कोच होण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापनाचा विश्वास मिळवला आणि संघाला विश्वविजेते बनवले. अमोलनेही महिला संघाचे कोच होऊन त्यांना विश्वविजेते बनवले.


