सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या विकासाबाबत भारतीय जनता पार्टीने केलेल्या पाठपुराव्याला तत्कालीन पालकमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तब्बल दोन कोटीचा विकास निधी मिळाला आहे. आगामी काळात आम्ही एक कोटी निधीची मागणी केली असून सावंतवाडीच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल सरचिटणीस अँड. संजू शिरोडकर, शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, माजी नगरसेवक उदय नाईक व आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, सोशल मीडिया अध्यक्ष केतन आजगावकर, सांगेली सरपंच तथा मंडळ उपाध्यक्ष लहू भिंगारे, पुंडलिक कदम यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान मल्टीस्पेशालिटीसाठी राजघराण्याकडून जे जे हवे ते सर्व सहकार्य केले आहे. आमच्या सर्वांच्या सह्या झाल्या असून यापुढे मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी माहिती देखील युवराज लखमराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी काळातही एक कोटीच्या आसपास विकास कामे करण्यात येतील, असे सांगण्यात आले शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडवरेकर म्हणाले पालकमंत्री यांच्याकडे आम्ही शहराच्या विकासासाठी यापूर्वी दोन कोटीची मागणी केली होती त्यानुसार त्यांनी ती मागणी पूर्ण केली असून आगामी काळात एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान यावेळी श्री. आडिवरेकर म्हणाले, सावंतवाडी संस्थानाच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे नाव चर्चेत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या चर्चेत आहे. यासाठी आम्ही सर्व जण देखील योग्य तो पाठपुरावा करीत आहोत. मात्र पक्ष वरिष्ठ आणि आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी नगरसेवक तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक यांनी सांगितले की, आमचे सहयोगी मित्रपक्षातून सावंतवाडीकरांची दिशाभूल केली जात आहे. सावंतवाडी शहरासाठी केवळ शिवसेनेच्या माध्यमातून नव्हे तर महायुतीच्या माध्यमातून आणि विशेषत: आमचे नेते रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला असून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी काल केलेल्या स्टेटमेंटचा आणि यापूर्वी केलेला स्टेटमेंटचा एकदा स्वतः विचार करावा, असा सल्लाही श्री. नाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, आगामी काळात आम्ही सुद्धा स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


