सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवणार असून २० नगरसेवक व नगराध्यक्षांची एक जागा अशी त्यांनी तयारी केली आहे. महाविकास आघाडी बाबतीतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे. नगराध्यक्षाची जागा लढविण्यासाठी आम्ही आग्रही असून सीमा मठकर आमच्या उमेदवार असतील, अशी घोषणा, संघटक निशांत तोरसकर यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री.तोरसकर म्हणाले, मनसेसाठीही आमचा विचार सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडून सीमा मठकर यांना आम्ही विनंती केली आहे. त्या देखील सेनेतून इच्छुक आहेत. सुसंस्कृत असा वारसा सावंतवाडीला आहे. राजकारणाचा पायंडा घालून दिलेल्या घराण्याचा वारसा त्यांना आहे. राजकारणातील सुवर्ण दिवस पुन्हा यावे यासाठी माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सीमा मठकर यांना आम्ही विनंती केली आहे. सामाजिक कार्यात त्या अग्रस्थानी असल्याने त्यांना निश्चितच सावंतवाडीकर निवडून देतील असा विश्वास श्री. तोरसकर यांनी व्यक्त केला. पैसे वाटून फक्त निवडून येऊ शकत नाही हे सावंतवाडीचे मतदार दाखवून देतील. इथला मतदार विकला जात नाही हे मतदार दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेला आम्हाला १५० च मताधिक्य अन् विधानसभेला आम्हाला ४ हजार मत मिळाली. मतदार आमच्या बाजूने आहे. पैशाचं राजकारण आम्ही मोडीत काढू असा विश्वास व्यक्त केला. तर समिरा खलील, कृतिका कोरगावकर, दुराली रांगणेकर, श्रृतीका दळवी, उमेश कोरगावकर, शेखर सुभेदार, शैलेश गवंडळकर हे नगरसेवकासाठी देखील इच्छुक असल्याचीही माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीकडून अद्यापतरी समन्वयाची भूमिका नाही. त्यामुळे आम्ही तयारी ठेवलेली आहे असही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, आशिष सुभेदार, शैलेश गौंडाळकर, शब्बीर मणियार, शेखर सुभेदार, कृत्तिका कोरगांवकर, श्रुतिका दळवी, समीरा खलील, जावेद शेख आदी उपस्थित होते.


