सावंतवाडी : नाट्य उताऱ्यांचे अभिवाचन केल्यामुळे नाटके पाहण्याची व नाटके वाचण्याची सवय लागते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल व मुलांना नाट्य उतारे व नाटके वाचण्याची सवय लागेल. तसेच कलाकारांना एकत्र आणणाऱ्या नाट्य कलेतून जनजागृती करण्यासह ज्वलंत प्रश्न नाटकातूनच मांडता येतात. त्यामुळे नाट्य संस्कृती जोपासण्यासह नाट्यकला जिवंत राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती सदस्य म. ल. देसाई यांनी केले.
५ नोव्हेंबर या ‘मराठी रंगभूमी दिनाचे’ औचित्य साधून दाणोली श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात म. ल. देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी मुंडले, निवृत्त केंद्रप्रमुख सोमनाथ ठाकूर, वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे, उपाध्यक्ष भास्कर परब, कवयित्री सौ शमिका नाईक, रश्मी सावंत, नामदेव राऊळ, विजय बांदेकर, गिरीधर चव्हाण, विलास जंगले, समीर नाईक, ग्रंथपाल दीपा सुखी, दिलीप सुकी आदी उपस्थित होते.

(सावंतवाडी : दाणोली येथील कार्यक्रमात उपस्थित म. ल. देसाई, भरत गावडे, चिंतामणी मुंडले, सोमनाथ ठाकूर, भास्कर परब, शमिका नाईक, नामदेव राऊळ, विजय बांदेकर, दीपा सुकी, रश्मी सावंत आदि.)
चिंतामणी मुंडे यांनी बालवाचकांसाठी मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक ऐतिहासिक, पौराणिक, नाटकाबद्दल आपले विचार व्यक्त करताना नाटक पाहिल्यामुळे समाजातील विविध समस्या समजतात असे सांगितले. सोमनाथ ठाकूर यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगून प्रत्येकाने वाचनीय पुस्तके वाचून इतरांनाही वाचण्यास प्रवृत्त करावे तरच वाचन संस्कृती वाढेल व टिकेल. तसेच वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी शमिका नाईक ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी साटम महाराज वाचनालयाच्यावतीने दरवर्षी दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून दिले जातात ही गौरवाची बाब आहे. वाचन संस्कृती वाढवले पाहिजे तरच आपले मराठी भाषा टिकणार आहे असे सांगितले.
यावेळी वस्त्रहरणकार मालवणी नाटककार कै गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधुन साटम महाराज वाचनालयाच्यावतीने ग्रामीण भागातील वाचकांसाठी दहा दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले. त्यांचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नवोदित कवयित्री सौ शमिका नाईक यांच्या सुरभी या काव्यसंग्रहावर भरत गावडे यांनी भाष्य करून ग्रंथालयाच्यावतीने शमिका नाईक यांचा शाल श्रीफळ व दिवाळी अंक भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी येत्या १४ नोव्हेंबर रोजीच्या बाल दिनासाठी बालकांनी पुस्तके वाचावी यासाठी शिक्षक राजेंद्र देसाई यांनी ५००० रुपये किमतीची पुस्तके ग्रंथालयाला दिली. तर दत्ताराम सडेकर यांनी तीन दिवाळी अंक दिले. या सर्वांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भरत गावडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून कै गंगाराम गव्हाणकर यांच्या साहित्य प्रवासाबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच मालवणी भाषेला साता समुद्रा पलीकडे नेणारे वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गव्हाणकर यांनी खऱ्या अर्थाने मालवणी भाषेला दर्जा मिळवून दिला असल्याचे सांगून एका बोली भाषेमध्ये एवढे दर्जेदार नाटक लिहिण्याचे सामर्थ्य गंगाराम गव्हाणकर यांनी करून दाखवले हा आपला सर्वांचा गौरव आहे. त्यामुळे आपण आपल्या लोककला जोपासुन दशावतार त्यांनाही प्रेरणा दिली पाहिजे, असे आवाहन केले. वाचनालयाच्या सदस्य रश्मी सावंत यांनी आभार मानले.


