सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने ४०० पैकी ३७९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या विजयानंतर आयुष आता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत करणार असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले (राजेसाहेब), चेअरमन सौ. शुभदादेवी भोसले (राणीसाहेब) विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक डॉ. शामराव सावंत, संस्थेचे सदस्य सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, मदर क्वीन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, तसेच प्रा. एम. ए. ठाकुर पालक दत्तप्रसाद पाटणकर यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
आयुष यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. गतवर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘गुणवंत खेळाडू’ हा सन्मानही प्राप्त झाला होता.
त्याच्या मेहनतीमुळे आणि वडिल दत्तप्रसाद पाटणकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे आयुषची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली असून, सिंधुदुर्गकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

(फोटो – राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सावंतवाडीचा नेमबाज कु. आयुष पाटणकर यांचा सत्कार करताना सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले (राजेसाहेब) आणि इतर मान्यवर.)


