सावंतवाडी : सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून एकनिष्ठ आणि सातत्याने सावंतवाडी शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सातत्याने उपक्रमशील असणाऱ्या ‘घे भरारी फाउंडेशनच्या’ माध्यमातून विशेषत: महिला वर्गात लोकप्रिय असणाऱ्या मोहिनी मडगावकर यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी आपला दावा पेश केला आहे. भाजपाच्या निष्ठावान आणि अनुभवी कार्यकर्त्या मोहिनी मडगांवकर यांनी आगामी नगराध्यक्षपदासाठी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. महिला अध्यक्ष म्हणून दोन वेळा केलेले प्रामाणिक काम, सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क यामुळे त्यांच्या नावाला शहरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असा त्यांचा दावा आहे.
मडगांवकर यांनी भाजप पक्षात महिला अध्यक्षा म्हणून दोन वेळा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम पाहिले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली, जी जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्याचे कौतुक होऊन त्यांना जिल्हा कार्यकारिणीमध्येही स्थान मिळाले. पक्षाच्या संघटना वाढीमध्ये त्यांनी हिरीरीने काम केले असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तळमळीने महिलांची संघटना वाढवली. राणेंसोबत भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजप पक्षाचे सर्व अभियान घरोघरी पोहोचवून शहरात आणि गावागावात पक्ष वाढवण्याचे काम निष्ठेने केले आहे.


