ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताच्या या सलामी जोडीने या संधीचा चांगला फायदा घेत स्फोटक सुरुवात केली. शुबमन आणि अभिषेकने ब्रिस्बेनमधील द गाबा मैदानात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने या फटकेबाजी दरम्यान 11 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. अभिषेकने यासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली.
अभिषेकने काय विश्वविक्रम केलाय?
नॅथन एलिस याने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील टाकलेल्या पहिल्या बॉलवर अभिषेकने 2 धावा घेतल्या. अभिषेकने यासह 11 धावा केल्या. अभिषेक यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. अभिषेकने याबाबत ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. टीमने 569 बॉलमध्ये 1 हजार टी 20i रन्स पूर्ण केल्या होत्या. मात्र अभिषेकने डेव्हीडच्या तुलनेत 41 बॉलआधी 1 हजार रन्स पूर्ण केल्या. अभिषेकने 1 हजार टी 20i धावांपर्यंत पोहचण्यासाठी 528 चेंडूंचा सामना केला.
तसेच अभिषेक टीम इंडियासाठी वेगवान 1 हजार धावा पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव याच्यांनतर पहिला तर एकूण दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने 573 बॉलमध्ये 1 हजार टी 20i रन्स केल्या होत्या.
टी 20i मध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे फलंदाज –
अभिषेक शर्मा : 528 बॉल, टीम डेव्हीड : 569 बॉल, सूर्यकुमार यादव : 573 बॉल, फिल सॉल्ट : 599 बॉल.


