कल्याण : पती-पत्नी असो किंवा इतर कोणंतही नातं असो, त्याचा पाया असतो तो म्हणजे विश्वास. पण या विश्वासा तडा गेला किंवा संशयाचा किडा डोक्यात वळवळला तर तो अख्खं आयुष्य पोखरून काढतो आणि मग सगळं उद्ध्वस्त होतं. असंच काहीस घडलं ते कल्याणमध्ये. तिथे संशयाच्या भुताने पछाडलेल्या नवऱ्याच्या कृत्यामुळे अख्खी सोसायटी हादरली. हायप्रोफाईल सोसायटीमध्ये रक्तरंजित घटना घडली आणि एक संसार क्षणात बेचिराख झाला. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतःवरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या वरप गावातील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये घडली आहे. संतोष पोहोळ असे आरोपचे नाव असून त्याने पत्नी विद्या संतोष पोहोळ (वय 40) हिचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. त्यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार करत आयुष्य संपवण्याचा प्रय्तन केला. यात तो गंभीर जखमी झाला, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ल्याण तालुका पोलिस ठाण्यात संतोषवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात असलेल्या विश्वजीत प्रिअर्स या आलिशान सोसायटीत आरोपी संतोष पोहळ हा त्याची पत्नी विद्या पोहळ आणि दोन मुलांसह राहतो. संतोष हा ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती. काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून विद्या आणि संतोष यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते.
गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या दोघांत पुन्हा याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी संतापाच्या भरात संतोषने पत्नी विद्यावर धारदार चाकूने सपासप वार करून, गळा चिरून तिची हत्या केली. मात्र पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडू तडफडत ठार झाली, ते पाहून भानावर आलेल्या संतोषने पश्चाताप व्यक्त केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पत्नीचा जीव गेल्याचे पाहून संतोषने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती कळताच कल्याण तालुका पोलीस त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवून दिला. तर जखमी अवस्थेत खाली कोसळलेल्या संतोषला उचलून उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयाकडे हलवण्यात आले. ज्या ठिकाणी संतोषची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे कल्याण तालुक्यात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे


