सावंतवाडी : आम्ही ‘महायुती’चे भाग असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारलं जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्या भाजपा आणि शिंदे यांचं अंतर्गत असलेलं धुमशान बघता आम्ही किती वाट पहावी, त्यामुळे आम्ही त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देत आहोत. मात्र आता आम्ही सावंतवाडीच्या २० ही जागांवर आमच्या उमेदवारांना उभे करणार असून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी आमचे संभाव्य उमेदवार संपूर्ण तयारीने उतरणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून उल्का उमाकांत वारंग यांचं नाव आमच्या पक्षातर्फे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी दिली. सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. भोसले बोलत होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव शफिक खान, संपर्क प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांचे वतीने अनंतराज पाटकर, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, शहराध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना निर्मल, जिल्हा उपाध्यक्ष मानसी देसाई, जिल्हा उपाध्यक्ष गुरुदत्त कामत, ॲड. सत्यवान चेंदवणकर, दीपक देसाई, सत्यजित देशमुख, सत्यप्रकाश गावडे, सतीश नाईक, डॉ. तुषार भोसले यांसह अन्य उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग म्हणाले की, महायुतीचे दोन्ही पक्ष जर आम्हाला कमी लेखण्याची चूक करत असतील तर महायुतीला त्याची उत्तरे आगामी काळात मतदार मतपेटीतून नक्कीच देणार. त्यामुळे केवळ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे सर्वस्व नाहीत. आमचा पक्ष कुठेही कमी नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधीही कमी लेखू नये. आम्ही निवडणूक लढविण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे आहेत, असे नमूद करताना श्री. वारंग यांनी महायुतीच्या मित्र पक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचा इशारा देत दिलाय.


