मुंबई : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 फेब्रुवारी–मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. या बहुप्रतिक्षित मेगा इव्हेंटसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, त्याच्यावर पुन्हा एकदा देशाच्या अपेक्षांचे मोठे ओझे असेल. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली. याच वेळी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.
टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरूद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका टी-20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट आहे. या मालिकेसाठी निवडलेला संघच वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे या मालिकेसाठी निवडलेल्या संघाकडे लक्ष होतं. पण बीसीसीआयने टी20 वर्ल्डकप आणि न्यूझीलंड मालिकेसाठी एकच संघ असेल असं स्पष्ट केलं आणि चर्चांवर पडदा पडला. भारत आणि दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेसाठी निवडलेला संघच जवळपास या मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. टीम इंडियाच्या 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. संघात तीन बदल करण्यात आले आहेत. यातून शुबमन गिलला वगळण्यात आलं आहे. अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दुखापतीमुळे अक्षर पटेल दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांना मुकला होता. त्याच्या ऐवजी संघात शाहबाज अहमद याची निवड केली होती. मात्र न्यूझीलंड आणि टी20 वर्ल्डकप संघातून शुबमन गिल, जितेश शर्मा, शाहबाज अहमदला वगळण्यात आलं आहे. त्याच्या ऐवजी संघात पुन्हा एकदा अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. तर शुबमनला वगळण्यात आलं असून रिंकु सिंह आणि इशान किशनची निवड करण्यात आली आहे. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्या जोरावर त्याला संघात स्थान मिळालं आहे.
टी- 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ: अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रिंकु सिंह, इशान किशन (विकेटकीपर).
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिका –
- 21 जानेवारी: पहिला टी20, नागपूर
- 23 जानेवारी: दूसरा टी20, रायपूर
- 25 जानेवारी: तिसरा टी20, गुवाहाटी
- 28 जानेवारी: चौथा टी20, विशाखापट्टणम
- 31 जानेवारी: पाचवा टी20, तिरुवनंतपुरम
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून अंतिम सामना 20 मार्च रोजी होणार आहे. भारत गट अ असून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), नामिबिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारतीय संघाचे गट सामने अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली), वानखेडे स्टेडियम (मुंबई), आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो) आणि नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) येथे होतील.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचे सामने –
- 7 फेब्रुवारी 2026: भारत vs युएसए, मुंबई
- 12 फेब्रुवारी 2026: भारत vs नामीबिया, दिल्ली
- 15 फेब्रुवारी 2026: भारत vs पाकिस्तान, प्रेमदासा, कोलंबो
- 18 फेब्रुवारी 2026: भारत vs नेदरलँड्स,अहमदाबाद


