सावंतवाडी : भाजपाचा युवा चेहरा असलेले विशाल परब पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. माजी मंत्री आणि सावंतवाडीतले बडे प्रस्थ मानले जाणारे आमदार दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला कोणी सावंतवाडीतच आव्हान देईल?, याची राजकीय वर्तुळात कोणी आजवर कल्पनाही केली नव्हती.
मागील विधानसभा निवडणुकीत विशाल परब या युवा चेहऱ्याने दीपक केसरकर यांना दिलेले आव्हान चांगलेच गाजले होते. मात्र त्या आव्हानाचे विजयात रूपांतर करण्यात विशाल परब यांना अपयश आले होते. तरीही लक्षवेधी मते घेत त्यांनी त्याचवेळी महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर वर्षभरातच दमदार कमबॅक करत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी सगळ्या अर्थाने पूर्णपणे झोकून देत जोरदार तयारी केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही त्यांना पूर्ण साथ दिली. अखेर आज विशाल परब यांनी तो चमत्कार घडवून आणत सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत घरच्या मैदानावर दीपक केसरकर यांना कात्रजचा घाट दाखवत अनेक वर्षांची सत्ता त्यांच्याकडून खेचून घेत भाजपाच्या ताब्यात आणली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयाने त्यांचे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वजन निर्माण झाले असल्याचे दिसून येत असून हे कमबॅक आता त्यांच्या वाटचालीचे जोरदार राजकीय घोडदौडीत रूपांतरीत होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत.


