डोंबिवली : दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिव्यातील दिवा–आगासन रोड बेडेकर नगर मध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीला कुत्रा चावला आणि तिचा मृत्यू झाला. पिसाळलेला कुत्रा चावल्याने दिव्यात राहणारी ही 5 वर्षांची निरागस मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र महिन्याभराच्या उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. चौथे इंडेक्शन दिल्यावर तर तिची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामावर नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक संतप्त , चिमुकलीचा गेला जीव!
जवळपाास महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होते. तिथे तिला 4 इंजेक्शन्स देण्यात आली. मात्र त्यानंतर तिची प्रकती आणखीनच खालावली. उपचारांदरम्यानच 3 डिसेंबरला तिचा वाढदिवसही झाला, तेव्हा तिची प्रकृती जरा स्थिर होती. त्यानंतर 16 डिसेंबरला उपचारांचा शेवटचा टप्पा सुरू होता, तेव्हा तिला चौथं इंजेक्शन देण्यात आल्यावर तिची तब्येत अचानक बिघडली. त्यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याने उपचार पद्धती, औषधांचा दर्जा व वैद्यकीय निरीक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी महापालिका व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली असून या मृत्यूप्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.


