वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २४ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन प्रभारी प्राचार्य डॉ नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, हिंदी विभाग आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. संजीवनी पाटील यांनी ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदे तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.नामदेव गवळी यांनी ग्राहक जागरूकतेचे महत्त्व विशद करून प्रत्येक नागरिकाने जबाबदार व सजग ग्राहक बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मारूती कुंभार यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक साक्षरता निर्माण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. निलेश कारेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल भोसले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.रणजित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


