मुंबई : राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी आता राज्यातील सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. प्रत्येक पक्षाकडून जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी पूर्ण ताकद लावली जात आहे. राज्यात बऱ्याच महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवत आहेत. काही ठिकाणी फक्त भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी महायुतीत स्थानिक परिस्थिती पाहून युतीचे गणित ठरवले जात आहे. असे असतानाच आता कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीसाठी मात्र भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच झालेली पाहायला मिळत आहे. काहीही झालं तरी 83 पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका भाजपाने घेतली आहे.
नेमकं काय घडत आहे?
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा कठोर भूमिका घेताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहीही झालं तरी यावेळी महापौरपद भाजपालाच द्यावे, अशी मागणी भाजपाने केली आहे. मागील अडीच वर्ष आम्हाला महापौरपद दिले नाही. आता ५ वर्ष महापौर भाजपचाच असेल. भाजपाच्या वाट्याला महापौरपद तर शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद, असा युतीचा फॉर्म्यूला भाजपाकडून ठेवण्यात आला आहे. सोबतच काहीही झाले तरी आम्ही 83 पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशीही ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे.
तरच युती होणार अन्यथा…
भाजपाने 83 जागा मागताना एका सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपाचे 80 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे, असा दावा भाजपाने केला आहे. सोबतच आमच्या या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही युती करू अन्यथा आम्ही युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


