जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चांगलीच रंगणार असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकिटासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता अमळनेर विधानसभेचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात बड्या नेत्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय.
2019 च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळून सुद्धा पराभव पत्करावा लागलेल्या अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी 2024 ची निवडणूक मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनिल पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिरीष चौधरी यांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू
2014 साली देशात पंतप्रधान मोदी यांची लाट असताना ही अमळनेर येथील शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढून सुधा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत राहून 2019 ची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढविली होती. यावेळी मात्र त्यांचा मंत्री अनिल पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवाचे उत्तर देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्य असताना ही भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढवून मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
…म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार..॰
येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अपक्ष निवडणूक लढविली तर सगळ्याच पक्षातील लोकांचा आणि नाराज उमेदवारांचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला मागील काळात विजय मिळाला तसा याही वेळी मिळू शकेल, असा विश्वास असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचं शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे.
राजकीय वातावरण तापलं
मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात कोणतेही ठोस विकासकामे केले नाहीत. या उलट आपण आमदार असताना जास्तीचा निधी आणून जनतेची कामे केल्याचा दावा शिरीष चौधरी यांनी केला आहे. मंत्री अनिल पाटील यांचे आपल्यासाठी मोठे आव्हान नाही. आपण केलेल्या विकास कामावर जनता आपल्याला निवडून देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.


