सावंतवाडी : आपल्या सावंतवाडी मतदारसंघाला एक परंपरा आहे. ती परंपरा व पावित्र्य जपण्याचे काम मी आजवर करीत आलो आहे. ही पाटेकरांची भूमी असून इथे अनिष्ट प्रवृत्तींना थारा नाही तसेच इथे वाईट विचारही रुजत नाहीत. त्यामुळे राजन तेली यांचं ज्या पद्धतीचा राजकारण सुरू आहे ते चुकीचं असून येथील जनता त्यांना थारा देणार नाही. केवळ महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या माझ्यासारख्या व्यक्ती विरोधात उभे राहिल्याने आपल्याला प्रसिद्धी मिळेल या हेतूनेच ते निवडणूक लढवीत असून त्यांचे मनसुबे कधीही सफल होणार नाहीत यावेळी त्यांची पराभवाची हॅट्रिक निश्चित आहे, अशी टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.
दरम्यान, राज्याची जबाबदारी असल्याने मी येथील जनतेला वेळ देऊ शकलो नाही त्यामुळे काहीजण माझ्यावर नाराज आहे हे मला माहिती आहे. मात्र, यापुढील जास्तीत जास्त वेळ मी मतदार संघातील जनतेसाठी देणार असून पुढील काळात वरिष्ठांकडून कोकणची जबाबदारी मागून घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येथील जनतेसाठी जे काहीही करू शकले नाहीत कोणताही विकास केला नाही अशी मंडळी माझ्यावर नाहक टीका करीत आहेत.
अशी टीका सहन करून निवडणूक लढविण्यात मला स्वारस्य नव्हते मात्र सावंतवाडी मतदारसंघात मागील काही वर्षात हजारो कोटींचा निधी आणला आहे. अनेक प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच मला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहावे लागणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढवेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोकण हा सर्वात संपन्न प्रदेश आहे. मुंबई हा देखील कोकणचाच एक भाग आहे. त्यामुळे कोकण ही एक समृद्ध भूमी बनवणं हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मला केवळ कोकणासाठी काम करायचं आहे. रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातून मी कोकणच्या विकासासाठी येथील पर्यटन वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आहेत. यापुढेही कोकणच्या विकासासाठीच काम करायचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजन तेलींचा यापूर्वी दोन वेळा माझ्या विरोधात पराभव झाला आहे. ते माझ्या विरोधात लढल्याने त्यांचा पराभव होतो यात माझा दोष नाही. खरंतर त्यांना पराभवाची सवयच आहे. यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्यात आलं त्यानंतरच्या निवडणुकीत तेथेही त्यांचा पराभव झाला. आता वारंवार त्यांचा पराभव होतो यात आमचा दोष नसून त्याचं कारण त्यांनी शोधावं उगाच आमच्यावर टीका करू नये. आता ज्या घरात ते गेले आहेत तेथे त्यांनी खुश राहावं असे सांगत ‘नांदा सौख्यभरे ‘ असे ते म्हणाले.
सावंतवाडी हा संपन्न मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेकांना इच्छा होते. राजन तेली यांना देखील सावंतवाडी मतदारसंघात का हवा असा सवाल उपस्थित करीत ते कणकवलीचे आहेत त्यांनी कणकवलीतून निवडणूक लढवावी अथवा त्यांच मुळगाव असलेल्या कुडाळमधून लढावं. सावंतवाडीला एक वेगळी परंपरा आहे व येथील जनता अशा प्रवृत्तींना स्थान देणार नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवत असताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मला नक्कीच साथ देतील. भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटून निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची भेट झाल्यावर सर्वच कामाला लागतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निलेश राणे यांनी प्रवेश केल्यास स्वागतच : दीपक केसरकर
महाराष्ट्रात भाजप शिवसेना व मित्रपक्षांची महायुती एकसंघ आहे. त्यामुळे एखाद्या जागेत अदलाबदल करणे हा महायुतीचाच एक भाग आहे. यापूर्वीही पालघर मध्ये भाजपने शिवसेनेला एका जागेसह उमेदवार देखील दिला होता. नारायण राणे यांचा राजकीय उदय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेतूनच झालेला आहे त्यामुळे त्यांचे पुत्र निलेश राणे हे शिवसेनेत येत असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत आहे, असे यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


