नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घमासान दिसून येत आहे. कारण माजी खासदार समीर भुजबळ हे विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. पक्ष सोडू पण सुहास कांदेचे काम करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत.
समीर भुजबळ अपक्ष उमेदवारी अर्ज करणार दाखल –
आज मंत्री छगन भुजबळ येवला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर समीर भुजबळ हे 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आता समीर भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


