सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व युवा नेते विशाल परब यांचा अर्ज आज वैध ठरला. अर्ज वैध ठरल्यानंतर विशाल परब आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत सावंतवाडीचे दैवत श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर चरणी लीन झाले. यावेळी त्यांनी दोन्ही देवतांचे आशीर्वाद घेत आपल्या विजयाच्या बाबतीत साकडे घातले.

दरम्यान माध्यमांशी बोलताना विशाल परब म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला जर जनतेचा आशीर्वाद असेल तर नक्कीच या मतदारसंघाचा इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिला जाईल. असे नमूद करत विशाल परब यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. तसेच ही निवडणूक म्हणजे येथील तरुणाईची दिशा ठरवणारी निवडणूक असून मला सामान्य युवक आणि सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तीनही तालुक्यातील जनतेचा मोठा आशीर्वाद प्राप्त आहे, असे म्हणत त्यांनी विजयाची खात्री असल्याचे सांगितले.


