Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड, ताज लँड्स हॉटेलमध्ये मोठ्या घडामोडी.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निकालानंतर १५ व्या विधानसभेमध्ये शिवसेना (शिंदे गट) विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक, आज मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेजी यांच्या अध्यक्षतेत ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिंदे गटाकडून याबाबत अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

ठराव क्र १ – महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे आभार –

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं मतांचं भरभरुन दान शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पदरात टाकलं. ज्या हिरीरीने आणि उमेदीने मतदारांनी निर्विवाद आणि सुस्पष्ट कौल दिला, त्याला राज्याच्या राजकीय इतिहासात तोड नाही. असा ऐतिहासिक विजय कुठल्याही पक्षाला आजवर मिळाला नाही, ते यश आई भवानीच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला प्राप्त झालं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थानं जनतेनंच पूर्ण करुन दिलंय. रयतेचं लोककल्याणकारी राज्य साकारण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी यशस्वीरित्या पेललं. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांची त्यांना समर्थ साथ लाभली. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं जो उदंड प्रतिसाद दिला, त्यासाठी जनतेच्या आभाराचा ठराव येथे मांडत आहोत.

कुठल्याही सरकारच्या कल्याणकारी राजवटीचा लाभ सर्वप्रथम जनतेलाच मिळायला हवा, याची जाणीव ठेवून शिंदे सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, लाडका भाऊ, लाडके शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवनवीन योजना कार्यान्वित केल्या. सर्वसामान्य जनतेच्या खात्यात थेट लाभ पोहोचवणाऱ्या शिंदे सरकारला जनतेनं मुक्त हस्ते शाबासकी दिली. या कल्याणकारी योजनांसोबत विकास कामांनाही सरकारने प्राधान्य दिले. महाराष्ट्राच्या जनतेच्या या निर्भेळ कौलामुळे आमच्यावरील जबाबदारी आणखीनच वाढली आहे. आता आणखी दुप्पट जोमानं काम करण्यासाठी आम्ही सारे कटिबध्द आहोत. महाराष्ट्रासाठी स्थैर्य, विकास आणि जनकल्याणाची निवड करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी हा ठराव मांडण्यात येत आहे.

सूचक – श्री गुलाबराव पाटील

अनुमोदक -श्री शंभूराज देसाई

ठराव सर्वानुमते मान्य.

ठराव – २) पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे अभिनंदन –

खोटारडेपणा, अहंकारचा पराभव करुन महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला महाकौल दिला आहे. या भव्य विजयाचे प्रमुख शिल्पकार, महायुतीचे मार्गदर्शक आणि आमचे प्रेरणास्थान पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांचे आम्ही या दणदणीत विजयाबद्दल त्रिवार अभिनंदन करतो. महायुतीचे एक प्रमुख रणनितीकार, तसेच भारताचे कणखर गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांचेही महाराष्ट्रातील महाविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार खऱ्या अर्थाने आदरणीय मोदीजीच पुढे नेत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात झंझावाती दौरे केला. आपल्या भाषणातून अवघ्या महाराष्ट्रात विचारांचा अंगार फुलवला. जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे आपण गेलो तरच देशाची प्रगती होईल असा संदेश त्यांनी आपल्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणांमधून दिला. विरोधकांनी त्यांच्या या घोषणांचा चुकीचा अर्थ काढून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सामान्य जनेतेला मोदीजींच्या भाषणाचा खरा अर्थ कळला. त्यामुळेच ते मोदीजींच्या आणि महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. शिवसेनेचे सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि लाखो पाठीराखांच्या वतीने आम्ही पंतप्रधानांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा आणि देशाचा विकास याच गतीने होऊन राज्य प्रगतीची एक नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.

महायुतीमधील तिन्ही पक्षांत सूसंवाद राखण्यात, जागावाटपापासून ते प्रचारसंभांपर्यंत सगळीकडे योग्य समन्वय राखण्यात अमितभाईं शाह यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक होती. महायुतीमधील प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता अमितभाईंच्या मार्गदर्शनाखाली एका निश्चित ध्येयासाठी अखंड काम करत होता. अमितभाईंनी आपल्या भाषणातून महाआघाडीचा कार्यक्रम, गेल्या अडिच वर्षात महायुती सरकारने केलेली कामे प्रभावी रितीने जनतेपर्यंत पोहोचवली, त्यामुळेच हा प्रचंड असा विजय साध्य झाला. महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभक्कम दान पडले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहांचे महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच शिवसेनेच्यावतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येत आहे.

सूचक – दादा भुसे

अनुमोदक – भारत गोगावले

ठराव एकमताने मान्य

ठराव क्र – ३) अभिनंदनाचा ठराव : श्री. एकनाथ शिंदे –

सत्तावीस महिन्यापूर्वी सुरु झालेल्या महाराष्ट्रातील एका स्थित्यंतराचं रुपांतर दिमाखदार विजयात व्हावं हा काही योगायोग नाही. सत्तावीस महिन्यातील अनेक कडूगोड अनुभव मागे टाकून संपूर्ण महाराष्ट्र आज एका नव्या पर्वाला प्रारंभ करतोय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे यांच्या समर्थ नेतृत्त्वाखाली महायुतीने ‘न भूतो न भविष्यति’ असा विजय मिळवला. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मा. अजितदादा पवार यांची त्यांना समर्थ साथ लाभली. महायुतीच्या या विजयाचे निनाद दीर्घकाळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमतील.

२०१९ साली जनमताची बेईमानी झाल्यानंतर केवळ स्वाभिमान आणि सच्चाई या दोनच गोष्टींशी प्रामाणिक राहून एक नेता सत्तेच्या खुर्चीवर लाथ मारुन निघाला. …विशेष म्हणजे या नेत्याच्या मागे एक-दोन नव्हे, तर आमच्यासारखे चाळीसहून अधिक खंदे शिलेदार जिवाची बाजी लावून मैदानात उतरले. एका बाजूला प्रचंड जुलमी, सूडबुध्दीने वागणारी सत्ता होती, दुसऱ्या बाजूला मराठी स्वाभिमान आणि सच्चाई. या नेत्याचं नाव होतं- एकनाथ संभाजी शिंदे!

महाराष्ट्राच्या या कर्तबगार सुपुत्रानं अखेर जनतेचे पांग फेडले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी हाती दिलेला भगवा दिमाखानं पुन्हा फडकत ठेवला. रयतेच्या कल्याणकारी राजवटीचं स्वप्न साकार केलं. सत्तेच्या लोभापायी ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण टाकला होता, तो सोडवून आणला, आणि आम्हा शिवसैनिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. लोकशाही सरकारचा पहिला भागीदार जनताच असते. त्या जनतेला थेट लाभ देणाऱ्या अनेक योजना आणून मा. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या घराघरात हसू फुलवलं. गावागावात समाधानाचं वारं खेळू लागलं. गोरगरिब, महिला, शेतकरी, दलित, वंचित, तरुण, ज्येष्ठ व सर्व समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ऐतिहासिक निर्णय घेत मा. एकनाथजी शिंदे यांनी सामाजिक आणि आर्थिक न्याय समाजातील तळागाळापर्यंत नेला.

या न्यायाचे राज्यात ७ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत अडीच कोटी बहिणींचे लाडके भाऊ म्हणून आज त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री म्हणजेच सीम जरी असले तरी ते कायम कॉमन मॅन सारखेच सक्रिय असतात. कार्यकर्त्यासारखेच अहोरात्र राबणाऱ्या शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून लौकिक निर्माण केला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. अमितभाई शहा यांच्या पाठबळाच्या साथीनं महाराष्ट्राचा विकास प्रचंड वेगाने झाला.

…आणि हे सारं अवघ्या सव्वादोन वर्षात घडलं.

अपमान, शिव्याशाप, खोटेनाटे आरोप हे सारं आता मागे पडलंय. आपल्या शिवसेनेचं सुवर्णयुग सुरु झालंय, अशीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे. या दिमाखदार यशाचं संपूर्ण श्रेय आमचे लाडके माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनाच आहे. यापुढेही महाराष्ट्राच्या विकासयात्रेत आम्ही प्रत्येक जण…. प्रत्येक क्षण…. शरीरातल्या प्रत्येक कणासह खांद्याला खांदा लावून मा. शिंदेसाहेबांसोबत राहू. कार्यकर्त्यांचे नेते, गोरगरिबांचे कैवारी, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, आर्थिक न्यायाचे शिल्पकार आणि आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्णत्वास नेणारे व्हिजनरी नेते म्हणून आज महाराष्ट्र आपल्याकडे बघत आहे. महायुतीचे यश हे आपल्या कामाची पोचपावती आहे. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून उगवलेल्या एकनाथ शिंदे नावाच्या या तेजस्वी विकाससूर्याच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही मांडत आहोत. जय महाराष्ट्र!

सूचक – श्री संजय राठोड

अनुमोदक – श्री संजय शिरसाट

ठराव एकमताने मंजूर –

ठराव क्र ४ – श्री एकनाथ शिंदे, शिवसेना वि.स.स, कोपरी-पाचपखाडी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गट नेते पदी निवड करण्यात येत आहे.

सूचक – श्री उदय सामंत

अनुमोदक – श्री प्रताप सरनाईक

ठराव एकमताने मंजूर,

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles