मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर महायुतीचा खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर मंगळवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत चर्चेला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या 5 डिसेंबरच्या शपविधीपूर्वी खातेवाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. ही भाजप आणि अजित पवार गटासाठी दिलासादायक बाब ठरु शकते. मात्र, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना हवे असलेले गृहखाते दिले जाणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेला गृहखाते न दिल्यास भाजप एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये कशाप्रकारे सामील करुन घेणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अद्याप एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रातील नेते गृहखाते शिवसेनेला देण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते सुरुवातीला त्यांच्या मूळगावी जाऊन राहिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे आजारपणामुळे ठाण्यातील निवासस्थानीच थांबून होते. मात्र, गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे आता एकनाथ शिंदे मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी खातेवाटपाबाबत चर्चा करु शकतात.
भाजपची नेता निवड उद्या –
भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. बुधवारी सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर संपन्न होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
ADVT –




