कणकवली : कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथे सांस्कृतिक विभाग आयोजित माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी केशवरावजी राणेसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विचार मंचावर प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, ज्युनिअर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरीभाऊ भिसे, अधीक्षक संजय ठाकूर,वरिष्ठ लिपिक संजय राणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी माजी आमदार केशवराव राणेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले, केशवरावजी राणेसाहेब यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य आम्हा सर्वांना महाविद्यालयात काम करताना ऊर्जा देणारे आहे. साहेबांनी उभारलेले हे शिक्षण संकुल विकसित व विस्तारीत करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.साहेबांचा ‘केशवप्रभा’ हा उपलब्ध ग्रंथ आहे, त्यामध्ये अधिक व्यापकता यावी यासाठी साहेबांच्या समकालीन सहकाऱ्यांकडून त्यांच्या संदर्भातील विविध आठवणी आणि विचार संकलित करून हा ग्रंथ आणखी अर्थपूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.साहेबांनी पेरलेले हे शिक्षणरुपी बीज यापुढेही बहरण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया अशा शब्दांत त्यांनी केशवराव राणे यांना आदरांजली वाहिली.
प्रा.विजयकुमार सावंत यांनी कै. केशवराव राणे यांच्या आठवणींना उजाळा देऊन साहेबांनी आपल्या कार्यातून ओळख निर्माण केल्याचे सांगितले.जेष्ठ लिपिक संजय राणे यांनी कै. केशवरावजी राणेसाहेबांच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.प्रा.महादेव माने यांनी राणे साहेबांच्या शैक्षणिक कार्याची माहिती विशद केली व प्रा हरीभाऊ भिसे यांनी राणेसाहेबांच्या आठवणी सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सीमा हडकर व सूत्रसंचालन प्रा.डॉ.मारोती चव्हाण तर आभारप्रदर्शन प्रा.सचिन दर्पे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ADVT –




