रत्नागिरी : जर कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे नारायण राणे यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येते.
कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. कारण कोकणातले भाजप नेते हे राज्यातील सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा साठी सक्रिय झाले आहे. नाणार रिफायनरी समर्थक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राणे यांचं विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.
भाजपा नाणार रिफायनरीसाठी प्रयत्नशील तर नाही ना?
2019 मध्ये नाणार येथील रिफायनरीसाठीचे जमीन अधिग्रहण रद्द केले गेले. त्यानंतर बारसूचा विषय चर्चेत आला. पण, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि निवडणुकीच्या निकालानंतर देखील बार्शी येथे रिफायनरी होणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्यामध्ये नारायण राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नारायण राणे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? भाजपा नाणार रिफायनरीसाठी प्रयत्नशील तर नाही ना? असे प्रश्न यातून उपस्थित होतात.
नाणार रिफायनरी समर्थक देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार-
कोकणातील नाणार येथे रिफायनरी करावी यासाठी आता नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. फडणवीस यांच्या भेटीसाठी रिफायनरी समर्थकांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. त्यामुळे आता बारसू ऐवजी नाणार इथं रिफायनरी करा. जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशी बाजू फडणवीस यांच्याकडे मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला नक्की भेटीची वेळ देतील अशी आशा रिफायनरी समर्थकांना आहे.


